गोवंशहत्या बंदीनंतरही बेलोऱ्याचा कातडीबाजार सुरुच
By Admin | Updated: July 27, 2016 00:07 IST2016-07-27T00:07:12+5:302016-07-27T00:07:12+5:30
राज्य शासनाने गोवंशहत्या बंदी कायदा लागू केला असताना बेलोरा (विमानतळ) येथे भरणारा विदर्भातील सर्वात मोठा गोवंश कातडी बाजार आजही सुरु आहे.

गोवंशहत्या बंदीनंतरही बेलोऱ्याचा कातडीबाजार सुरुच
पोलिसांवर प्रश्नचिन्ह : कोट्यवधींची उलाढाल
अमरावती : राज्य शासनाने गोवंशहत्या बंदी कायदा लागू केला असताना बेलोरा (विमानतळ) येथे भरणारा विदर्भातील सर्वात मोठा गोवंश कातडी बाजार आजही सुरु आहे. येथे गोवंशाचे कातडे आणून विकले जात असून दर रविवारी कोट्यवधी रुपयांची आर्थिक उलाढाल होत असल्याचे वास्तव आहे. अकोला महामार्गालगत सुरु असलेला गोवंशाचा हा कातडी बाजार पोलिसांना दिसत नाही काय? , यावर चिंतन करण्याची जबाबदारी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवर आहे.
मागील आठवड्यात चांदूरबाजार नजीकच्या खरवाडी येथे गोवंशाची वाहतूक करणाऱ्या एका ट्रकने तीन निष्पापांचा बळी घेतल्यानंतर समाजमन सुन्न झाले. मध्यप्रदेश तसेच राज्याच्या सीमेवरुन अमरावती जिल्ह्यात अवैधरित्या गोवंशाची वाहतूक, मांसविक्री होत असल्यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. मात्र, गोवंशाचा कातडी बाजार सुरु असून, याकडे कोणाचेही लक्ष नाही. बेलोरा येथील कातडी बाजारात मध्यप्रदेश, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ तसेच आंध्रप्रदेशातून गोवंशाचे कातडे विकावयास आणले जाते. बेलोरा (विमानतळ) येथील कातडी बाजारात देशभरातून व्यापारी कातडे खरेदीसाठी दाखल होतात. कोलकाता, हैद्राबाद, बंगळूर, मुंबई, दिल्ली आदी शहरांतून कातडे खरेदीसाठी येणाऱ्या व्यापाऱ्यांकडून कातडे व्यवहारात कोट्यवधींची उलाढाल होत असल्याची विश्वसनीय माहिती आहे.
बेलोरावासी त्रस्त
अमरावती : बेलोरा येथील गोवंश कातडी बाजार हा लोणी (टाकळी) पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असून जिल्हा पोलीस अधीक्षक लखमी गौतम यास सर्वस्वी जबाबदार आहे. दर रविवारी या बाजारात शेकडो वाहनांद्वारे गोवंशाचे कातडे आणले जात असताना ग्रामीण पोलिसांनी एकही कारवाई करु नये, ही बाब चिंतनीय मानली जात आहे. बेलोऱ्याचा कातडी बाजार विदर्भात सर्वात मोठा गणला जातो. बेलोरा कातडी बाजार परिसर लागला की वाहन चालक, नागरिकांना नाकाला हात लावूनच पुढे सरकावे लागते. या भागात अतिशय घाणरडा असा दर्प ही बाब नित्याचीच झाली आहे.
पोलिसांना पुरविली जाते रसद
बेलोर येथे गोवंशाचा कातडी बाजार नियमीत सुरु ठेवण्यासाठी लोणी पोलिसांना मोठी रसद कातडी व्यावसायीकांकडून दिली जात असल्याची माहिती आहे. हा बाजार पोलिसांच्या आशीर्वादाशिवाय सुरु राहू शकत नाही, असे बेलोरा येथील काही ग्रामस्थांचे म्हणने आहे. या कातडी बाजारामुळे बेलोरावासियांचे जगणे कठीण झाल्याची कैफियत ‘लोकमत’ कडे मांडण्यात आली आहे. (वार्ताहर)