देवमाळीत कंटेनमेंन्ट झोनला पलंगाचा आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:18 IST2021-02-26T04:18:36+5:302021-02-26T04:18:36+5:30
जाहीर मुनादी : लॉकडाऊनमध्ये बांधकाम सुरूच, पोलीस ठाण्यात तक्रार परतवाडा : कोरोनाचा हॉट स्पॉट बनलेल्या देवमाळी ग्रामपंचायत क्षेत्रात सर्वत्र ...

देवमाळीत कंटेनमेंन्ट झोनला पलंगाचा आधार
जाहीर मुनादी : लॉकडाऊनमध्ये बांधकाम सुरूच, पोलीस ठाण्यात तक्रार
परतवाडा : कोरोनाचा हॉट स्पॉट बनलेल्या देवमाळी ग्रामपंचायत क्षेत्रात सर्वत्र कंटेनमेन्ट झोन बघायला मिळत आहे. या कंटेनमेन्ट झोनला आता पलंगाचा आधारही दिला गेला आहे. देवमाळीत, जिल्हा परिषद सदस्य प्रताप अभ्यंकर यांच्या घरालगत हे कंटेनमेंन्ट झोन असून त्याला लोखंडी पलंग लावले गेला आहे.
देवमाळीत जिल्हाधिकाऱ्यांनी संचारबंदी घोषित केली आहे. सोबत लॉकडाऊन असल्यामुळे बाहेरच्या व्यक्तींचा देवमाळी क्षेत्रात वावर नको म्हणून बांधकाम सुरू असलेल्या ३० ठिकाणांची ग्रामपंचायत प्रशासनाने, आपत्ती व्यवस्थापन समितीने मंगळवारी पाहणी बांधकाम थांबविण्याचे निर्देश दिले. तसेच जाहीर मुनादीही दिली. संभाव्य कारवाईची माहितीही दिली. दरम्यान बुधवारला परत त्यातील काही बांधकामे त्यांना सुरू दिसलीत. बाहेरच्या व्यक्तींचा वावरही बघायला मिळाला. सांगूनही ऐकत नसल्याचे त्यांच्या निदर्शनास येताच अचलपूरचे तहसीलदार मदन जाधव यांनाही याची माहिती देण्यात आली.
सरपंचा पद्मा सोळंके, उपसरपंच शैलेश म्हाला, सचिव ताज पठाण, पोलीस पाटील प्रताप पाटील, ग्रामपंचायत कर्मचारी राहुल सरोदे यांनी स्वत: परतवाडा पोलीस ठाण्यात जाऊन संबंधिताविरुद्ध बुधवारी लिखित तक्रार दिली. तक्रारीची प्रत उपविभागीय अधिकारी अचलपूर, तहसीलदार अचलपूर व अचलपूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनाही देण्यात आली. दरम्यान, सूचना देऊनही ज्या पाच लोकांची बांधकामे सुरू होती, अशांकडून प्रत्येकी ३ हजार असा एकूण १५ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.