सख्खा भाऊच बनला वैरी

By Admin | Updated: September 13, 2014 23:31 IST2014-09-13T23:31:49+5:302014-09-13T23:31:49+5:30

वडिलांच्या जागेवर कृषी विभागात नोकरीला लागलेला भाऊ आपल्या कुटुंबासाठी पैसे न देता दारुच्या व्यसनात खर्च करीत असल्याने लहान भावाने मोठ्या भावाची हत्या करुन मृतदेह नालीत फेकून दिला.

Becoming a Real Brother | सख्खा भाऊच बनला वैरी

सख्खा भाऊच बनला वैरी

कृष्णार्पण कॉलनीतील घटना : आर्थिक अडचण, व्यसनातून हत्या
अमरावती : वडिलांच्या जागेवर कृषी विभागात नोकरीला लागलेला भाऊ आपल्या कुटुंबासाठी पैसे न देता दारुच्या व्यसनात खर्च करीत असल्याने लहान भावाने मोठ्या भावाची हत्या करुन मृतदेह नालीत फेकून दिला. ही घटना स्थानिक कृष्णार्पण कॉलनीत शनिवारी सकाळी उघडकीस आली.
किशोर नारायण श्रीपदवार (४१), असे मृताचे तर गजानन नारायण श्रीपदवार (३२), असे आरोपीचे नाव आहे. रविकिरण कॉलनीत हे कुटुंब भाड्याने राहते. या कुटुंबात दोन भावांसह लहान भाऊ राजूसह आई प्रमिला देखिल राहते. किशोर हा अनुकंपावर कृषी विभागात मजूर श्रेणी २ चा कर्मचारी होता. गजानन हा रंगकाम करतो. तर लहान भाऊ राजू हा वाहने खरेदी-विक्रीचा धंदा करतो.
सफाई कर्मचाऱ्याला दिसला मृतदेह
किशोर हा नोकरीवर असल्याने जास्त पैसे कमवित होता. मात्र घरी पैसे देण्याऐवजी तो दारुत पैशाची उधळपट्टी करीत होता. ही बाब गजाननला सतत खटकत होती. त्याच्या आईलाही निवृत्ती वेतन मिळते.
काही दिवसांपूर्वी आई देवरणकरनगर येथे बहिणीकडे गेली होती. त्यामुळे ११ सप्टेंबर रोजी किशोर व गजानन हे दोघे भाऊ बहिणीकडे गेले. तेथे आईकडून निवृत्ती वेतनाची रक्कम घेतली. त्याच रात्री गजाननने मोठा भाऊ किशोरला यथेच्छ दारु पाजली. यातून त्यांच्यात वाद झाला आणि त्याचवेळी घरातून क्रिकेटचा स्टंप आणून किशोरच्या डोक्यावर प्रहार केला. यात त्याचा मृत्यू झाला. एवढ्यावरच न थांबता गजाननने किशोरचा मृतदेह एका पोत्यात भरुन दुचाकी वाहनाने रात्रीलाच कृष्णार्पण कॉलनीतील नालीत फेकून दिला.
ही घटना दोन दिवसांनंतर नाली सफाईसाठी आलेल्या सफाई कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आली. ही माहिती राजापेठ पोलिसांना देण्यात आली.
पोलिसांनी अवघ्या काही तासांतच आरोपीचा शोध लावण्यात यश मिळविले. आरोपी गजानन श्रीपदवार याला हत्येच्या आरोपात अटक करण्यात आली.
दारुच्या नशेत सतत होत होता वाद
किशोर श्रीपदवार हा दारुच्या आहारी गेलेला होता. घरात पैसे न देता तो दारुत पैसे उडवीत असल्याने घरात सतत भावांमध्ये खटके उडत होते. वडिलांच्या निधनानंतर अनुकंपा तत्वावर मिळालेल्या नोकरीचा आपल्याला कोणताही लाभ होत नसताना केवळ मोठा भाऊच मलिदा खात असल्याचे गजाननला सतत खटकत होते. यातूनच वाद होत होता. या वादाचे पर्यावसान अखेर भावाला संपविण्यात झाले.
तासाभरात लावला छडा
शनिवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास कृष्णार्पण कॉलनीत सफाई कर्मचारी नालीची साफसफाई करीत होते. येथील रहिवासी शरद देशपांडे यांच्या घरामागील नालीमध्ये कर्मचाऱ्यांना मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती राजापेठ पोलिसांना मिळताच सहायक पोलीस उपनिरीक्ष राठोड हे ताफ्यासह घटनास्थळी पोहोचले व मृतदेह शवविच्छेदनाकरिता इर्विन रुग्णालयात पाठविला. राजापेठच्या डीबी स्कॉडने मृताच्या घराची पाहणी केली. गजाननच्या दुचाकीवर रक्ताचे डाग आढळून आले प्रकरणाचा उलगडा झाला.

Web Title: Becoming a Real Brother

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.