मध्यवर्ती आगार बनले समस्यांचे माहेरघर !
By Admin | Updated: March 9, 2017 00:21 IST2017-03-09T00:21:37+5:302017-03-09T00:21:37+5:30
मध्यवर्ती आगारात घाणीचे साम्राज्य निर्माण झाल्यामुळे विविध आजाराला उपस्थित प्रवाशांना सामोरे जावे लागू शकते.

मध्यवर्ती आगार बनले समस्यांचे माहेरघर !
कचरा व घाणीचे सम्राज्य : स्वच्छता केव्हा?
अमरावती : मध्यवर्ती आगारात घाणीचे साम्राज्य निर्माण झाल्यामुळे विविध आजाराला उपस्थित प्रवाशांना सामोरे जावे लागू शकते. नागरिक आगाराच्या भिंतीवरच उघड्यावरच लघुशंका करीत असल्यामुळे येथे घाण वास येतो. त्यामुळे नागरिकांना अतोनात त्रास सहन करावा लागतो, या ठिकाणी स्वच्छतेचे धिंडोळे निघाले आहे. केव्हा करणार परिसराची स्वच्छता, असा सवाल प्रवासी विचारत आहे.
अमरावती आगारात एकूण ८० पेक्षा जास्त बसेस आहेत. इतर आगाराच्याही शेकडो फेऱ्या येथून रोज ये-जा करतात. त्यामुळे येथे हजारो प्रवाश्यांची रोजच वर्दळ असते. अनेक प्रवासी काही खालल्यानंतर येथे लावण्यात आलेल्या कचरापेट्यांमध्ये फळ व इतर वेस्टेज मटेरीयल न टाकता सार्वजनिक ठिकाणी परिसरात कुठेही ते फेकून देतात. त्यामुळे येथे अनेक ठिकाणी सर्वत्र कचरा पडलेला आढळते. आगाराच्यावतीने येथे काही सफाई कामगार नेमले आहे. परिसर नियमित स्वच्छतेची जबाबदारी त्यांच्याकडे असते. परंतु नियमित स्वच्छता करण्यात येत नसल्यामुळे येथे घाणीचे साम्राज्य निर्माण होतात. येथे मध्यवर्ती आगार वर्कशॉपच्या मधात एक भिंत आहे. त्या भिंतीवर सायंकाळी व भरदिवसा सुध्दा नागरिक सर्व नियम धाब्यावर बसवून उघड्यावर लघुशंका करताना आढळते. पण येथे उपस्थित आगाराचे कर्मचारी नागरिकांना हटकण्याचे तसदी घेत नाही. त्यामुळे येथे लघुशंका करू नये, असे फलक लावण्यात यावे व जर नागरिक येथील अधिकृत प्रसाधनगृहाचा वापर करीत नसतील तर त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारावा, अशी मागणी काही प्रतिष्ठित प्रवाशांनी केली आहे. याकडे परिवहन विभागाने लक्ष देण्याची मागणी होत आहे्.
आजार होण्याची शक्यता ?
आगार परिसरात घाणीचे साम्राज्य आहे. त्यामुळे प्रवाशांना विषाणुजन्य आजार जडण्याची शक्यता नाकारता येत नाही. घाण व अस्वच्छ जागेवर नागरिक लघुशंका करतात, तेथे पाणी टाकण्याची कुठलीही व्यवस्था नसते. त्यामुळे परिसरात उभ्या राहणाऱ्या प्रवाशांना विविध प्रकारचे आजार जडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
उघड्यावरच टाकतात फळांची टरफलं
नागरिक खाललेले फळ उघड्यावर फेकून परिसरात घाण करतात. नागरिकांनीसुद्धा आगारात अस्वच्छता करू नये, स्वच्छतेची जबाबदारी ही प्रत्येक प्रवाशांची आहे. परिसरात लावण्यात आलेल्या कचरापेटीतच कचरा व इतर वेस्टेज पदार्थ टाकावेत व आगारातील कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन अमरावती आगार व्यवस्थापकांनी केले आहे.