जिल्ह्याचे सौंदर्य अधोरेखीत करणाऱ्या विविधतेचे सौंदर्यीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:12 IST2021-03-28T04:12:36+5:302021-03-28T04:12:36+5:30
अमरावती : जिल्ह्यातील येथील पौराणिक व ऐतिहासिक धरोवर, नैसर्गिक सौंदर्य व कृषी संपदा लक्षात घेऊन मुंबई येथील जे. ...

जिल्ह्याचे सौंदर्य अधोरेखीत करणाऱ्या विविधतेचे सौंदर्यीकरण
अमरावती : जिल्ह्यातील येथील पौराणिक व ऐतिहासिक धरोवर, नैसर्गिक सौंदर्य व कृषी संपदा लक्षात घेऊन मुंबई येथील जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्सच्या सहकार्याने जिल्हा प्रशासनाने विविध प्रकल्प हाती घेतले आहेत. यामुळे विविध ठिकाणी सुविधांच्या उभारणीसह सौंदर्यीकरणात भर पडून पर्यटनालाही चालना मिळणार आहे.
पायाभूत सुविधांची उभारणी करताना प्रत्येक काम गुणवत्तापूर्वक करण्याबरोबरच जिल्ह्याचा प्राचीन वारसा, निसर्ग संपदा यांची जपणूक व्हावी. पर्यटनाला चालना देण्यासाठी महत्त्वाच्या स्थळांचा विकास व्हावा, त्यात जिल्ह्याची वैशिष्ट्ये अधोरेखित करणा-या कलाकृतीचा समावेश असावा, असे निर्देश पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी दिले होते. त्यानुसार जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्सच्या कलावंतांना निमंत्रित करून विविध स्थळांच्या विकासाबाबत चर्चा केली. त्यातून अनेक नवनव्या संकल्पना पुढे आल्या. या संकल्पनांचा विकास करून जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्सच्या कलावंतांनी अनेकविध आराखडे सादर केले. त्यानुसार काम सुरू करण्यात आले आहे.
बॉक्स
संत, महापुरुषांचे कार्य पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविणार
* संत गाडगेबाबा निर्वाणभूमी वलगाव येथे जिल्ह्यातील प्राचीन, ऐतिहासिक बाबींची माहिती देणारे प्रदर्शन व संग्रहालय उभारण्यात येईल. याद्वारे पर्यटनाला चालना मिळेल.
* राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा, डॉ. पंजाबराव देशमुख यांचे जीवनचरित्र नव्या पिढीपर्यंत पोहोचावे यासाठी जे जे स्कूल ऑफ आर्टस् या संस्थेकडून विशेष प्रकल्प उभारण्यात येणार आहे.
* राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची कर्मभूमी श्रीक्षेत्र मोझरी आणि श्री क्षेत्र कौंडण्यपूर, तसेच संत गाडगेबाबा निर्वाणभूमी वलगाव येथे मूलभूत निवासी आराखड्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
* शेकडो वर्षांचा वारसा असलेल्या व स्थापत्य शैलीसाठी प्रसिद्ध पौराणिक स्थळांच्या विकासासाठी राज्यात १०१ कोटी नियतव्यय प्रस्तावित केला आहे. त्यातून दर्यापूर तालुक्यातील लासूरच्या आनंदेश्वर मंदिराचाही विकास केला जाणार आहे.
बॉक्स
चिखलदऱ्याच्या सौंदर्यात पडणार भर
निसर्गसुंदर मेळघाटच्या अरण्यात शिखरावर वसलेल्या चिखलदरा गिरीस्थानी अनेकविध कलाकृतींतून तेथील सौंदर्यात भर पडणार आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचतत्वांबाबत विशाल कलाकृती, तसेच चिखलदऱ्याच्या पौराणिक संदर्भाची माहिती देणारे शिल्पही उभारले जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.
बॉक्स
संत्रा प्रकल्प, मँगो व्हिलेज अन् इनलँड वॉटर टुरिझम
संत्रा हे जिल्ह्यातील प्रमुख फळपीक आहे. त्यामुळे संत्रा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी अत्याधुनिक संत्रा प्रक्रिया केंद्र उभारण्यात येणार आहे. देशभर नावाजले गेलेल्या अप्रतिम चवीच्या संत्र्याचे उत्पादन हे जिल्ह्याचे वैशिष्ट्य आहे. या वैशिष्ट्याचाही समावेश आराखड्यात करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे, जिल्ह्यातील आमझरी हे ‘मँगो व्हिलेज’ म्हणून विकसित करण्यात येणार असून, जिल्ह्यातील जलप्रकल्प व तेथील नैसर्गिक संपदा लक्षात घेता ‘इनलँड वॉटर टुरिझम’वर भर देण्यात येणार आहे. त्याचाही प्रकल्पात समावेश असेल.
कोट
अमरावतीचे पौराणिक व ऐतिहासिक महत्व मोठे आहे. हा थोर संत व महापुरुषांचा प्रदेश अन् निसर्गसौंदर्याने नटलेली ही भूमी आहे. प्राचीन वारसा जपणे व उत्कृष्ट पायाभूत सुविधांसह पर्यटनाला चालना देणे यासाठी वेगवेगळे प्रकल्प हाती घेण्यात येत आहेत.
- यशोमती ठाकूर
पालकमंत्री
कोट
जिल्ह्याची वैशिष्ट्ये लक्षात घेऊन त्यानुसार आम्ही जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्सच्या कलावंतांशी चर्चा केली व त्यांनी पाहणी केली. चांगल्या संकल्पनांची निवड करून आता सुविधा उभारणी व विविध स्थळांच्या विकासाचे काम हाती घेण्यात आले आहे.
-शैलेश नवाल,
जिल्हाधिकारी