तालुकास्थळी आता बीट मार्शल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:24 IST2021-02-05T05:24:22+5:302021-02-05T05:24:22+5:30
धामणगाव रेल्वे : चांदूर रेल्वे, तिवसा, कुऱ्हा व धामणगाव रेल्वे या ठिकाणी महिलांची अधिक वर्दळ असते. अशा ...

तालुकास्थळी आता बीट मार्शल
धामणगाव रेल्वे : चांदूर रेल्वे, तिवसा, कुऱ्हा व धामणगाव रेल्वे या ठिकाणी महिलांची अधिक वर्दळ असते. अशा ठिकाणच्या शाळा, महाविद्यालय परिसरात टवाळखोरांकडून छेडखानीच्या घटना घडतात. शहरातील कॉलनी परिसरात टवाळखोर मुलांचा त्रास सहन करावा लागतो़. या घटना रोखण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक हरिबालाजी एन. यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस महिलांचे बीट मार्शल सुरू करणार आहेत. प्रत्येकी दोन महिला कर्मचारी शहरात सतत गस्त घालतील. त्यामुळे महिलांची सुरक्षा होणार असल्याचे नवनियुक्त पोलीस उपअधीक्षक जितेंद्र जाधव यांनी सांगितले.
पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे, गावठी दारू, गुटखा विक्री, रेती तस्करी यासह विघातक कृत्य सुरू असेल आणि त्यात एखाद्या पोलीस प्रशासनातील कर्मचाऱ्यांचा सहभाग आढळल्याचे सिद्ध झाल्यास, अशा पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना आपली नोकरी गमवावी लागेल, अशी तंबी चांदूर रेल्वेचे नवनियुक्त पोलीस उपअधीक्षक जितेंद्र जाधव यांनी उपविभागातील सहा पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांना दिले आहेत. मूळचे सांगली येथील रहिवासी असलेले जाधव हे सन २००९ च्या डीवायएसपी बॅचचे अधिकारी आहेत. गत आठवड्यात ते चांदूर रेल्वे येथे पोलीस उपअधीक्षक म्हणून रुजू झाले. आपल्या भागातील २६ बीटमधील साडेचार लाख जनतेच्या सुरक्षेची जबाबदारी आपल्यावर आहे. अवैध धंदे, रेती तस्करी, अवैध प्रवासी वाहतूक, चोरी, गुटखा विक्री, गावठी दारूविक्री अशा धंद्यांवर निर्बंध ठेवण्याचे काम सर्वांचे आहे. यात कायदा व सुव्यवस्थेला धोका पोहोचणार नाही, याची जबाबदारी आपली असल्याच्या सूचना त्यांनी ठाणेदारांना दिल्या.
-----------