शेतकऱ्यांप्रती तळमळ ठेवा

By Admin | Updated: June 22, 2015 00:12 IST2015-06-22T00:12:31+5:302015-06-22T00:12:31+5:30

शेतकरी जगला तर आपण जगू. त्यामुळे खरीप पीक हंगामात कर्ज वाटप करताना कागदी घोडे नाचवू नका.

Be patient with farmers | शेतकऱ्यांप्रती तळमळ ठेवा

शेतकऱ्यांप्रती तळमळ ठेवा

पीककर्ज आढावा बैठक : पालकमंत्र्यांचा बँक अधिकाऱ्यांना सल्ला
अमरावती : शेतकरी जगला तर आपण जगू. त्यामुळे खरीप पीक हंगामात कर्ज वाटप करताना कागदी घोडे नाचवू नका. पीककर्ज पुनर्गठनासाठी शेतकरी बँकेत आला की, त्यांना त्वरेने कर्ज मंजूर करा, त्यांच्याप्रती तळमळ ठेवा, असा सल्ला पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी रविवारी येथे बँकेच्या अधिकाऱ्यांना दिला.
येथील बचत भवनात रविवारी पीककर्ज पुनर्गठन व नवीन पीककर्ज वाटपासंदर्भात बँक अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या आयोजित कार्यशाळेत ते विशेष अतिथी म्हणून बोलत होते. यावेळी खा. आनंदराव अडसूळ, आ. वीरेंद्र जगताप, आ. बच्चू कडू, आ. रमेश बुंदिले, विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर, जिल्हाधिकारी किरण गित्ते, जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यपालन अधिकारी अनिल भंडारी, पोलीस आयुक्त राजकुमार व्हटकर, जिल्हा पोलीस अधीक्षक लखमी गौतम, कृषी सहसंचालक सु. रा. सरदार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय मुळे, स्टेट बँकेचे सिंग, बँक आॅफ महाराष्ट्राचे सोनुले, सेंट्रल बँकेचे संजय देवसर आदी उपस्थित होते. पुढे बोलताना ना. पोटे यांनी शेतकऱ्यांना कर्ज वाटप करताना कोणत्याही बँकेच्या प्रबंधकांना अडचणीत येऊ देणार नाही. वेळप्रसंगी त्यांच्या पाठीशी उभे राहू, अशी ग्वाही त्यांनी दिली. मागील आठ दिवसांत ७८१ कोटींचे कर्ज वाटप केले. पुढील १० दिवसांत पुन्हा ८०० कोटींचे कर्ज वाटप करायचे आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी मनापासून काम केल्यास नक्कीच पुण्य लाभेल, असे पोटे म्हणाले. जिल्ह्यात २ लाख २१ हजार ९४८ खातेदारांना १६९५ कोटी रुपये पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट आहे. आतापर्यंत ४६ टक्के कर्ज वाटप करण्यात आले आहे. प्रसंगी शासन व प्रशासन बँक अधिकाऱ्यांच्या पाठीशी उभे राहू, असे ना. पोटे यांनी स्पष्ट केले. केंद्र व राज्य शासन शेतकऱ्यांनी ताठ मानेने जगावे, यासाठी विविध योजनांची मुहूर्तमेढ रोवत आहे. परंतु सावकारापासून त्यांची फसवणूक होता कामा नये, यासाठी बँकेच्या अधिकाऱ्यांनी सावधगिरी बाळगावी, असे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या मदतीला तलाठी, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी सतत राहतील. मात्र, ३० जूनपर्यंत २०९ बँकांच्या शाखांनी ८०० कोटी रुपयांचे पीककर्ज वाटप करुन शेतकऱ्यांसाठी चांगले काम करण्याचे आवाहन ना. पोटे यांनी केले. यावेळी आ. जगताप, आ. कडू, आ. बुदिंले यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न मांडताना खरीप हंगाम सुरु होण्यापूर्वीच पीककर्ज वाटप करण्याची मागणी केली.

बँकेच्या एका शाखेला १० कोटी कर्ज वाटपाचे उद्दिष्ट्य
३० जूनपर्यंत १६९५ कोटी रुपयांच्या कर्ज वाटपाचे उद्दिष्ट्य आहे. त्यानुसार जिल्ह्यातील २३ बँकांच्या २०९ शाखांमधून हे काम युद्धस्तरावर करावयाचे आहे. पुढील आठ दिवसांत ८०० कोटी रुपये कर्ज वाटप करायचे असल्याने एका शाखेला किमान १० कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट्य पूर्ण करावे लागेल, असे जिल्हाधिकारी किरण गित्ते म्हणाले. तलाठी बँकेतच लॅपटॉप घेऊन बसणार आहे. सातबारा जागेवरच मिळेल. शेतकऱ्यांना त्रास होणार नाही, याची काळजी प्रशासन घेत असल्याचे गित्ते यांनी स्पष्ट केले.

Web Title: Be patient with farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.