सावधान! तुमच्या दुचाकीवर चोरांची नजर

By Admin | Updated: December 12, 2015 00:05 IST2015-12-12T00:05:21+5:302015-12-12T00:05:21+5:30

मागील सात-आठ महिन्यांपासून सुरू असलेले दुचाकी चोरीचे सत्र अव्याहतपणे सुरूच आहे.

Be careful! Thieves watch your bike | सावधान! तुमच्या दुचाकीवर चोरांची नजर

सावधान! तुमच्या दुचाकीवर चोरांची नजर

चोरट्यांचा उच्छाद : डिसेंबरमध्ये १० दुचाकी लंपास
अमरावती : मागील सात-आठ महिन्यांपासून सुरू असलेले दुचाकी चोरीचे सत्र अव्याहतपणे सुरूच आहे. दरदिवशी दररोज कोणत्या ना कोणत्या चौकासह मॉल आणि अगदी शासकीय कार्यालयांमधून दुचाकी लंपास होत असल्याने वाहन ठेवायचे तरी कोठे, असा यक्षप्रश्न अमरावतीकरांना भेडसावतो आहे.
दुचाकींच्या वाढत्या चोऱ्या रोखण्याकरिता सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्याचा उपाय समोर आला असला तरी त्यासाठी महापालिका आणि पोलिसांच्या संयुक्त प्रयत्नांची गरज भासणार आहे. केवळ एखादा चौक, पालिका किंवा मॉलच नव्हे, तर संपूर्ण शहरच दुचाकी पार्किंगसंदर्भात असुरक्षित झाले आहे. त्यामुळे सीसीटीव्ही लावणार तरी कोठे, हा प्रश्नही उरतोच. शिवाय इतर गुन्ह्यांच्या तुलनेत दुचाकी चोरीच्या घटनांना पायबंद घालण्याचे आव्हान खुद्द पोलीस आयुक्तांनीही मान्य केले आहे. शहर परिसरातील विविध पोलीस ठाण्यांत रोज दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांची नोंद होत आहे. शहरात दुचाकी चोरट्यांनी उच्छाद मांडला आहे.
 

दररोजच होतात दुचाकी लंपास
अमरावती : दिवसेंदिवस वाढत असलेल्या वाहनचोरीच्या घटना रोखण्याचे आव्हान आता पोलिसांना पेलावे लागणार आहे.
मागिल ६ महिन्यात तर दुचाकी चोरटयांनी अक्षरश: कहर केला आहे. पोलिसांकडून राबविल्या जाणाऱ्या उपाययोजनांना हरताळ फासून सराईत चोरटे निमिषार्धात दुचाकी घेऊन पळ काढतात. चौकात रस्त्याच्या कडेला उभे केलेल वाहन असो वा सुरक्षित स्थळ म्हणून स्वत:च्या घराबाहेर ठेवलेली दुचाकी असो, काही वेळाने ती तेथे सापडेलच याची अजिबात शाश्वती राहिलेली नाही. मागिल काही दिवसांत ३० पेक्षा अधिक दुचाकी शहराच्या विविध भागातून लंपास करण्यात आल्यात. बडनेरा मार्गावरील ‘डी मार्ट’ या प्रतिष्ठानच्या पार्किंमधून मागिल ३० नोव्हेंबरला राहुल गायकी यांची ८० हजार रूपये किंमतीची दुचाकी चोरीला गेली. इतकेच नव्हे तर आठवड्यापूर्वी प्रचंड गजबलेल्या विभागीय आयुक्त कार्यालयाच्या परिसरातून दुचाकी लांबविण्यात आली. सिनेमागृहाच्या पार्किंगमधून गाड्या चोरीला गेल्याचे प्रकार सुध्दा उघड झाले आहेत. पोलिसांच्या नाकावर टिच्चून गजबजलेल्या आणि मध्यवर्ती ठिकाणांसह नागरी भागातून दुचाकी चोरीला जात आहेत.
शहरातील अनेक व्यावसायिक संकुलांसह इतर ठिकाणी पार्किंग नसल्याची ओरड केली जाते. मात्र, जर अधिकृत पार्किंग स्थळातूनही गाड्या चोरून नेल्या जात असतील तर गाड्या सुरक्षित आहेत तरी कोठे? असा प्रश्न पडतो.
शहरातील कॅम्प भागातील हेमंत देशमुख यांची दुचाकी मांगिलाल प्लॉट परिसरातून ८ डिसेंबरला सायंकाळी ७.३० ते ८ च्या सुमारास लंपास करण्यात आली. या प्रकरणी १० डिसेंबरला गुन्हा नोंदविण्यात आला. तर भाग्यश्री कॉलनीतील रहिवासी सुशील सुधाकर पवार यांची दुचाकी घरासमोरुनच चोरुन नेली. हा प्रकार ९ डिसेंबरला रात्री ८.५० च्या सुमारास घडला. गाडगेनगर उड्डाण पुलाजवळील कॅफेजवळून एक गाडी चोरीला गेली. परतवाडा येथील सागर मांडवगडे हा मित्रासोबत चहा पिण्याकरिता आला असता ९ डिसेंबरला सायंकाळी ६.४५ वाजताच्या सुमारास अज्ञात चोरट्याने त्याची दुचाकी लांबविली तर अगदी अलिकडे ८ डिसेंबरला जयस्तंभ चौकातील उड्डाणपुलाखालून पंकज मुंडेगावकर यांची २० हजार रुपये किंमतीची दुचाकी चोरीला गेली. तत्पूर्वी ७ डिसेंबरलाही बडनेरा पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीचा गुन्हा नोंदविण्यात आला.
नवीवस्ती बडनेरा येथील संजय सुखदेवे यांची २५ हजारांची दुचाकी साहिल लॉनमधून चोरीला गेली. पोलिसांत नोंद झालेले दुचाकी चोरीचे हे गुन्हे लक्षात घेता दुचाकी चोरटे दररोज गाड्या लंपास करीत आहेत, हे दिसून येते.

Web Title: Be careful! Thieves watch your bike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.