सावधान ! कार्बाईडच्या वापराने जिवाला धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2016 00:22 IST2016-06-30T00:22:59+5:302016-06-30T00:22:59+5:30
सावधान कॅल्शियम कार्बाईडने पिकविलेले आंबे, केळी खालल्याने जीवघेणा आजार होत आहे.

सावधान ! कार्बाईडच्या वापराने जिवाला धोका
पावसाळ्यातही विक्री सुरूच : एफडीए झोपतच
अमरावती : सावधान कॅल्शियम कार्बाईडने पिकविलेले आंबे, केळी खालल्याने जीवघेणा आजार होत आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे असून पावसाळयातही कार्बाईडच्या आंब्यांची जोरात विक्री करण्यात येत आहे. हजारो किंटल आंबे अंबानगरीत रोज विकले जात असून तेवढीच केळीसुध्दा विकली जात आहेत.
हार्डवेअरच्या दुकानात सहज उपलब्ध होणारे शेकडो किलो कार्बाईड आंबे पिकविण्यासाठी फळविक्रेते वापरत आहेत. अत्यंत घातक असा कर्करोग या आंब्यापासून होतो. सामान्य नागरिकांना या विषाबाबत साधी कल्पनाही नसते. आपण लहान मुलांसाठी जी फळे बाजारातून नेत आहोत ती फळे विषयुक्त आहेत. फळेविक्रेते कोटयावधी रूपये कमविण्यासाठी नागरिकांच्या जीवाशी रोज खेळत आहेत. मात्र, नागरिकांना चांगली फळे ते विकत नाहीत. येथील बाजार समिती परिसरात अनेक नोंदणीकृत फळांचे व्यापारी आहेत. येथूनच संपूर्ण अमरावती शहराला फळे विक्रीकरिता वितरित केली जातात. काही आंबे कार्बाईडने पिकविण्यात येतात तर आंबे व केळी पिकविण्यासाठी जास्त प्रमाणात ईथेलीन गॅसचा वापरही करण्यात येतो. अंबानगरी ही विदर्भाची सांस्कृतिक राजधानी आहे. येथील नागरिक जागृत आहेत. त्यामुळे अनेक जबाबदार नागरिकांनी आंबे खाण्याचे टाळले आहे. अंबानगरीत कार्बाईडने पिकविलेले आंबे विकले जात आहेत. केळी पिकविण्यासाठी ईथेलीन गॅसचा अधिक प्रमाणात वापर केला जात आहे. सफरचंदवर व्हॅक्स (मेणाचे थर) लावले जात आहे. खुलेआम जीवघेण्या गुटख्याची विक्री सुरु आहे. त्यामुळे अमरावतीत अन्न व सुरक्षा मानदे कायद्याची अंमलबजावणी होत आहे की नाही, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. मात्र निष्क्रिीय अन्न व प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांना अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट व एफडीए आयुक्त हर्षदीप कांबळे यांनी मोकाट का सोडले व त्यांच्या अशा बेजबाबदार अधिकाऱ्यांना अभय का, असा प्रश्न आता जनता विचारत आहे. विषयुक्त फळांपासून अमरावतीकरांना तातडीने मुक्ती देण्याची मागणी होत आहे.