सावधान! सुगरणींंचा जीव धोक्यात
By Admin | Updated: June 13, 2015 00:21 IST2015-06-13T00:21:53+5:302015-06-13T00:21:53+5:30
आज प्रत्येक सर्वसामान्य कुटूंबात गॅसचा स्वयंपाकाकरिता उपयोग केला जातो़ स्वयंपाकाचा गॅस हाताळताना होणारी घाई व ..

सावधान! सुगरणींंचा जीव धोक्यात
पाच वर्षांत बारा सिलिंडर स्फोट : मालमत्तेचे नुकसान, सावधगिरी गरजेची
मोहन राऊ त अमरावती
आज प्रत्येक सर्वसामान्य कुटूंबात गॅसचा स्वयंपाकाकरिता उपयोग केला जातो़ स्वयंपाकाचा गॅस हाताळताना होणारी घाई व दुर्लक्षामुळे पाच वर्षात घरगुती गॅस सिलिंडरचे बारा स्फोट झाले. यातून तिघांचा बळी गेला तर लाखो रूपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे़ कुटूंब प्रमुखांचे होणारे दुर्लक्ष देखील यासाठी कारणीभूत असून यामुळे सुगरणींचा जीव धोक्यात आला आहे़
दरवर्षी उन्हाळ्यात घरगुती गॅस स्फोटाचे प्रकार घडतात. यातून जिवित हानीचे प्रमाण सुदैवाने कमी असले तरी घरातील संसारोपयोगी साहित्य या स्फोटामध्ये जळून खाक होते़ पोलीस प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार गेल्या पाच वर्षात घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट होण्याच्या १२ घटना जिल्ह्यात घडल्या आहेत. स्फोटामुळे झालेल्या नुकसानातून आजपर्यंत या सर्वसामान्यकुटूंबांना सावरता आलेले नाही.
कंपन्यांची कार्यशाळा; महिलांचा अनुउत्साह
घरगुती गॅस पुरविणाऱ्या विविध कंपन्या दरवर्षी प्रत्येक शहरात गॅस हाताळताना कोणती काळजी घ्यावी, याविषयी कार्यशाळा घेतात. या कार्यशाळेतून विविध मार्गदर्शन कंपन्यांच्यावतीने महिलांना करण्यात येते़ परंतु महिला अशा कार्यशाळांना उपस्थित राहात नसल्याची कैफीयत या कंपन्यांच्या वितरकांनी मांडली़ गॅसचा वापर योग्य पध्दतीने केला तर अनुचित घटना टाळता येतात. कार्यशाळेला महिलांच्या अत्यल्प उपस्थितीमुळे महिलांना मार्गदर्शन करता येत नसल्याचे एका गॅस वितरकांनी सांगीतले़ यामुळे गॅस सिलिंडर वापराबाबत जागरूकता निर्माण करण्याची गरज आहे.
प्रचंड दुर्लक्षामुळेच अपघात
महिला पहाटे चहा तयार करण्यापासून तर रात्रीपर्यंत विविध खाण्याचे साहित्य या गॅसवर तयार करतात. घरातील सर्व कामे सांभाळताना गॅसच्या वापराकडे दुर्लक्ष होते. सिलिंडर बंद कपाटात ठेवणे, ऊन, पाऊस, धूळ यापासून सुरक्षित नसणे, गॅसजवळ रॉकेल, कागद, कपडे असे ज्वालाग्राही पदार्थ ठेवणे, सिलिंडरवर विविध भांडी ठेवणे, रेग्युलेटर व्यवस्थित न बसविणे, रबर ट्युबची सुरक्षा, आयएसआयचे मार्क नसणे, २४ महिन्यांपेक्षा अधिक जुन्या रबरी ट्युबचा वापर करणे, अशा प्रकारातून गॅस सिलिंडरचे स्फ ोट घडल्याचे कारण पुढे आले आहे.
अशी घ्यावी काळजी
गॅस सिलिंडर नेहमी उघड्या जागी ठेवावे, सिलिंडरच्या बाजूला वर्तमानपत्र, जुने कपडे, प्लॅस्टिकच्या पिशव्या ठेवू नयेत, रॉकेल, पेट्रोलसारखे ज्वालाग्रही पदार्थांचे डबे ठेवणे टाळावे, गॅस सिलिंडरच्या बाजूला ओलसर दमटपणा किंवा जास्त उष्णता निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी, सिलिंडर वापरात नसेल तर त्याची कॅप त्यावर लावून ठेवावी, वापरात असलेले सिलिंडर ठेवण्यासाठी चाकाच्या ट्रॉलीजचा वापर करू नये, रेग्युलेटर व्यवस्थित बसले किंवा नाही हे पाहण्यासाठी त्यावर साबणाचे पाणी टाकून बुडबुडे येतात का ते पहावे, गॅस पुरवठा करणारी रबरी नळी आयएसआयचा शिक्का असलेली घ्यावी, नळीची लांबी दीड मीटरपेक्षा जास्त असू नये, त्यावर कुठेही चिरा नसाव्यात. शेगडी सिलिंडरपेक्षा उंच असावी, शेगडी खिडकीजवळ ठेवू नये, स्वयंपाकाची पूर्वतयारी केल्यानंतरच शेगडी पेटवावी. प्रत्येक गॅसधारकांने विमा काढणे गरजेचे आहे़
स्वयंपाकाचा गॅस वापरताना महिलांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे़ दिलेल्या सूचनेचे योग्य पद्धतीने पालन केल्यास कोणतीही संभाव्य घटना टाळता येते़ सिलिंडर, प्रेशर रेग्युलेटर, रबर ट्युब, गॅस शेगडीचा वापर सजगतेने करावा.
- अशोक भंसाली,
धामणगाव गॅस अॅन्ड डोमेस्टिक अप्लायंसेस.