सावधान! विनाकारण फिराल तर करावी लागेल कोरोना चाचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:13 IST2021-04-22T04:13:03+5:302021-04-22T04:13:03+5:30
अमरावती : ३० एप्रिलपर्यंत शासनाने लॉकडाऊन जाहीर केले असून, अत्यावश्यक सुविधेकरिता सकाळी चार तासांची मुदत दिली आहे. मात्र, ११ ...

सावधान! विनाकारण फिराल तर करावी लागेल कोरोना चाचणी
अमरावती : ३० एप्रिलपर्यंत शासनाने लॉकडाऊन जाहीर केले असून, अत्यावश्यक सुविधेकरिता सकाळी चार तासांची मुदत दिली आहे. मात्र, ११ वाजतानंतरही नागरिक विनाकारण घराबाहेर पडताना दिसत आहेत. अशांवर कारवाईकरिता मुख्य चौकात आरोग्य विभागातर्फे अत्याधुनिक चार मोबाईल ॲम्बुलन्स व्हॅन तैनात केलेले आहेत. विचारणा केल्यानंतर पोलिसांना त्यांचे योग्य उत्तर न मिळाल्यास महापालिकेच्या पथकाद्वारा त्यांची कोरोना चाचणी( रॅपिड अँटिजेन टेस्ट ) केली जात आहे. बुधवारी दुपारी अडीच वाजेपर्यंत ४२१ जणांचे कोरोना टेस्ट करण्यात आली. यात १३ जण पॉझिटिव्ह आढळून आले.
नागरिकांची चाचणी केल्यानंतर १० मिनिटांत त्याचा अहवाल मिळत असून, रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्यास त्याला कोविड रुग्णालयात दाखल केले जात आहे. बुधवारी महापालिकेचे आरोग्य विभाग व पोलिसांच्यावतीने संयुक्त कारवाई राबवीत दुपारी अडीच वाजेपर्यंत मिळालेल्या माहितीनुसार पठाण चौकात १२० जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यापैकी एक पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला, तर इर्विन चौकात १२० जणांच्या कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात सहा जण पॉझिटिव्ह आढळून आले. तसेच जयस्तंभ चौकात ६३ चाचण्या करण्यात आल्या. यात एका रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आढळला नाही तर शेगाव नाका येथे ५६ पैकी चार पॉझिटिव्ह तर यशोदानगर येथे ६२ चाचण्यांपैकी दोन पॉझिटिव्ह आढळले. या कारवाईमुळे नागरिकसुद्धा धास्तावले असून त्यामुळे रस्त्यावरील गर्दी कमी होण्याची मदत होत आहे. बुधवारी रात्री पासून कडक लॉकडाऊन लागण्याचे निर्देश असल्याने पोलीस थेट गुन्हा दाखल करणार आहे. सध्या सुद्धा विनाकरण फिरणाऱ्या वाहन चालकांवर कलम १८८ अंतर्गत गुन्हा नोंदविला जात आहे. तसेच वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई सुद्धा केली जात आहे.
या कारवाईकरीता पोलीस आयुक्त आरती सिंह यांच्या मार्गदर्शनात सर्व ठाणेदार, तसेच महापालिकेचे आयुक्त प्रशांत रोडे व उपआयुक्त रवी पवार यांच्या मार्गदर्शनात सहायक आयुक्त भाग्यश्री बोरीकर, सहायक आयुक्त प्राची कचरे व त्यांची आरोग्य टिम कार्यरत आहेत.
बॉक्स
बाजार समितीनजीक ३६७ जणांची तपासणी
कृषी उत्पन्न बाजार समितीजवळ नागरिकांची गर्दी होत आहे. त्यामुळे महापालिकेच्या पथकाने या ठिकाणी मोबाईल ॲम्बुलन्स व्हॅन तैनात करून मंगळवारी ३६७ जणांची रॅपीड ॲन्टिजेन टेस्ट करण्यात आली. तसेच मास्क न घालणाऱ्या प्रत्येक ५०० रुपये असा २४ हजारांचा दंड वसूल केल्याची माहिती महापालिका उपायुक्त रवि पवार यांनी दिली.
कोट
संचारबंदी आदेश जारी आहेत. लॉकडाऊनमध्ये विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांना संबंधित ठाण्याचे पोलीस पथक अडवित आहे. त्यांना जाब विचारला जात आहे. समाधानकारण उत्तर न मिळाल्यास त्यांना कोरोना चाचणीसाठी महापालिकेच्या पथकाच्या ताब्यात देण्यात येत आहे. तसेच कलम १८८ अंतर्गत गुन्हासुद्धा नोंदविला जात आहे.
- आरती सिंह, पोलीस आयुक्त