सावधान, भाजी बाजारात जा, पण खिसे सांभाळा!
By Admin | Updated: July 29, 2015 00:14 IST2015-07-29T00:14:00+5:302015-07-29T00:14:00+5:30
वर्दळीच्या ठिकाणी मोबाईलचोर सक्रिय झाले असून शहरातील इतवारा व शुक्रवार बाजारात सर्वाधिक मोबाईल चोरीच्या घटना उघडकीस आल्या आहेत.

सावधान, भाजी बाजारात जा, पण खिसे सांभाळा!
वैभव बाबरेकर अमरावती
वर्दळीच्या ठिकाणी मोबाईलचोर सक्रिय झाले असून शहरातील इतवारा व शुक्रवार बाजारात सर्वाधिक मोबाईल चोरीच्या घटना उघडकीस आल्या आहेत. नागरिकांच्या खिशावर हातसफाई करून चोर मोबाईल लंपास करीत आहे. त्यामुळे नागरिकांनी बाजारात गेल्यावर सावधान राहून आपले खिसे सांभाळणे आता गरजेचे झाले आहे.
आजच्या युगात मोबाईल नागरिकांसाठी खेळ बनला आहे. त्यामुळे सहजरीत्या मोबाईल हाताळण्याची सवय नागरिकांना आहे. मात्र, तरीही चोर हातसफाईची कमाल दाखवून सुज्ञ नागरिकांनाही चकमा देत आहेत. फे्रजरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चपराशी पुऱ्याजवळ शुक्रवार बाजारात भाजी खरेदीसाठी नागरिकांची प्रचंड गर्दी होते. याच गर्दीचा फायदा घेऊन मोबाईल चोर नागरिकांच्या खिशातील मोबाईल लंपास केल्याच्या घटना घडत आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वीच शुक्रवार बाजारात दिवसभरात नऊ नागरिकांचे मोबाईल चोरी गेले. त्यात सुधीर गणवीर नामक युवकाने एका अल्पवयीनाला रंगेहात पकडले होते. त्यांची चौकशी करून आणखी दोन आरोपींना अटक केले होते. मात्र, चोरीच्या घटना घडतच आहेत.
वर्दळीच्या ठिकाणावरून नागरिकांच्या खिशातील मोबाईल चोरी होत असल्याचे निदर्शनास येत आहे. सायबर सेलकडून मोबाईल ट्रेस करून पुढील कारवाई संबंधित पोलीस ठाण्याकडे सोपविण्यात येते. चोरीचे मोबाईलचे लोकेशन महाराष्ट्राबाहेरचे अनेकदा निदर्शनास येत आहे.
कांचन पांडे, एपीआय, सायबर सेल.
चोरीच्या मोबाईलची अशी होते विल्हेवाट
शहरात अनेक राज्यांतील नागरिक व्यवसाय करण्याकरिता शहरात राहतात. त्यातच काही नागरिक शहरात मोबाईल चोरी करीत असल्याचे शुक्रवार बाजारातील विविध घटनांमुळे उघड झाले होते. अमरावतीमधून चोरी गेलेले मोबाईल बाग्लादेश, नेपाळ व अन्य काही राज्यात विक्री होत असल्याचे पोलिसांनी केलेल्या चौकशीदरम्यान निदर्शनास आले आहे.
सहा महिन्यांत सायबर सेलकडे ८७ तक्रारी
पोलीस आयुक्तालयातील सायबर सेलकडे जानेवारी ते जूनपर्यंत मोबाईल चोरीच्या ८७ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यापैकी सायबर सेलने ३५ मोबाईल ट्रेस केले असून आरोपींचे लोकेशन व पुढील कारवाईकरिता संबंधित पोलीस ठाण्याकडे पाठविण्यात आले आहे. याव्यतिरिक्त शहरातील दहा पोलीस ठाण्यांतर्गत सहा महिन्यांत २०० ते ३०० च्या जवळपास मोबाईल हरविल्याच्या व चोरी गेल्याच्या तक्रारी करण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.