सावधान! वरूडमध्ये कोरोनाचा प्रकोप अजून कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:11 IST2021-07-26T04:11:54+5:302021-07-26T04:11:54+5:30
पॉझिटिव्हची दररोज नोंद, नागरिकांचा बिनधास्त संचार, समारंभ, वीकएन्डला दुकानेही सुरू वरूड :- गतवर्षी २२ मार्चपासून सुरू झालेला कोरोनाचा कहर ...

सावधान! वरूडमध्ये कोरोनाचा प्रकोप अजून कायम
पॉझिटिव्हची दररोज नोंद, नागरिकांचा बिनधास्त संचार, समारंभ, वीकएन्डला दुकानेही सुरू
वरूड :- गतवर्षी २२ मार्चपासून सुरू झालेला कोरोनाचा कहर संपलेला नाही. वरूड तालुक्यात दररोज पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहेत. तरीदेखील नागरिक विनामास्क गर्दीच्या ठिकाणी बिनधास्त संचार करीत आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी पाचपेक्षा अधिक लोकांसाठी जमावबंदीचे आदेश जारी केले असले तरी मास्क न घालता तसेच फिजिकल डिस्टन्स न पाळता लोक समारंभांमध्ये सहभागी होत आहेत. वीकएंडला दुचानेही सुरू आहेत. त्यामुळे आरोग्यविषयक चिंतेचे ढग गोळा व्हायला लागले आहेत.
तालुक्यात गतवर्षी मार्च २०२० पासून कोरोनाचे सावट पसरले आणि पाहता पाहता दोन हजारांपेक्षा अधिक कोरोना पॉझिटिव्ह निघाले. लॉकडाऊनमध्ये अनेकांचा कोरोनामुळे प्राण गेला. कोणी बाप, तर कुणी आई , पत्नी, नवरा गमावला. अनेकांची कुटुंबे उघड्यावर आली. प्रशासनाने वेळोवेळो दिलेल्या सूचनांचे पालन होत गेल्याने दुसरी लाट आटोक्यात येत आहे. मात्र, त्याच्या परिणामी नागरिक उपाययोजनांबाबत बिनधास्त झाले आहेत.
नागरिक सर्रास विनामास्क फिरताना दिसतात, तर वाहनातून प्रवास करताना क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहनात असतात. बाजारात आणि वर्दळीच्या ठिकाणी हीच अवस्था आहे. विवाह सोहळे , कार्यक्रमावर मर्यादा आखून दिल्या असतानासुद्धा मर्यादेचे पालन होताना दिसत नाही. गर्दीने नियमावलीला केराची टोपली दाखविणली आहे. वीक एंडलासुद्धा दुकाने उघडी असतात. नगर परिषदेचे वाहन तेवढे दुपारी ४ वाजता सायरन वाजवून दुकाने बंद करण्याची सूचना देत असतात. मात्र, रात्रीपर्यंत दुकाने आणि बार उघडी असतात. यातूनच कोरोनाच्या पुढील लाटेला आमंत्रण मिळण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. कुठेही कोरोनाची भीती उरलेली नसून, बिनधास्त नागरिकांचा वावर आणि समारंभ पार पाडणे सुरू आहे.
आदेश कागदावरच
जिल्हाधिकाऱ्यांनी जमावबंदी आदेश जारी करून पाचपेक्षा अधिक नागरिकांनी एकत्र येऊ नये तसेच सभा, समारंभ आणि विवाह सोहळ्यावर बंदी घातली आहे. विवाहामध्ये केवळ ५० लोकांना परवानगी दिली आहे. तरी सर्व आदेश कागदावरच असून, पालन केले जात नसल्याने तालुक्यात कोरोनाचा कहर वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
शनिवारी सहा रुग्णांची नोंद
वरूड शहरात शनिवारी सहा रुग्णांची नोंद झाल्याने कोरोनाने तोंड वर काढल्याची चर्चा वैद्यकीय क्षेत्रात आहे. वेळीच दक्षता घेतली नाही, तर तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.