सावधान! मुलांना कोरोनाची लागण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:12 IST2021-05-19T04:12:54+5:302021-05-19T04:12:54+5:30
तीन दिवसांत २० मुले संक्रमित, अचलपूर तालुक्यातील आकडेवारी दखलनीय अनिल कडू परतवाडा : अचलपूर तालुक्यात लहान मुलांना कोरोनाची ...

सावधान! मुलांना कोरोनाची लागण
तीन दिवसांत २० मुले संक्रमित, अचलपूर तालुक्यातील आकडेवारी दखलनीय
अनिल कडू
परतवाडा : अचलपूर तालुक्यात लहान मुलांना कोरोनाची लागण होत असून, अवघ्या तीन दिवसांत २० मुलांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. यात पाच महिने, एक वर्ष, दोन वर्ष, पाच वर्ष, सहा वर्ष, आठ वर्ष, नऊ वर्ष, १० वर्षे, १२ वर्षे, १३ वर्षे व १४ वर्षे वयाच्या मुलांचा समावेश आहे. यात अचलपूर नगरपालिका क्षेत्रात आठ मुलांना कोरोनाची लागण झाली आहे. ग्रामीण भागांतर्गत कांडली ग्रामपंचायत क्षेत्रात सहा, देवमाळी, टवलार आणि काकडा ग्रामपंचायत क्षेत्रात प्रत्येकी एक, तर देवगाव ग्रामपंचायत क्षेत्रात पाच मुले कोरोना संक्रमित झाली आहेत.
सूत्रानुसार, कोरोनाग्रस्त मुलांची संख्या तालुक्यात याहूनही अधिक आहे. या मुलांसोबतच १८ ते ४५ वयोगटातील सर्वाधिक लोक कोरोना पॉझिटिव्ह येत आहेत. अचलपूर नगरपालिका क्षेत्रात १७ दिवसांत ७०० हून कोरोनाग्रस्त नोंदविले गेले आहेत. परतवाडा शहराला लागून असलेल्या कांडली ग्रामपंचायत क्षेत्रात २०० संक्रमित आहेत.
प्राप्त माहितीनुसार, कांडली क्षेत्रात मृतांची संख्या अधिक आहे. अनेक संक्रमितांचा उपचारादरम्यान कोविड रुग्णालयात मृत्यू झाला. पण, यातील बऱ्याच मृत्यूची नोंद किंवा माहिती संबंधित यंत्रणेकडे नाही. कांडली ग्रामपंचायत क्षेत्रात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या वाढत्या संख्येला नियंत्रित करण्यात प्रशासनाला यश आलेले नाही. एक-दोन दिवसाआड मृत्यूही होत आहेत.
बॉक्स
ग्रामीण भागात संसर्ग वाढताच
काकडा ग्रामपंचायत क्षेत्रात ५० कोरोनाग्रस्त असून, चार कोरोना संक्रमितांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. गौरखेडा कुंभी व कुंभीची उडान, रविनगर मिळून एकूण ४० कोरोनाग्रस्त नोंदविले गेले आहेत. यात चार हून अधिक मृत्यू झाले.
वडगाव फत्तेपूर ग्रामपंचायत क्षेत्रात ६० कोरोनाग्रस्त निघाले आहेत. येथे एका कोरोना संक्रमिताचा मृत्यू झाला. देवगावमुळे येथील परिस्थिती स्फोटक बनल्याचे सांगितले जात आहे. नारायणपूरमध्ये ३०, परसापूरमध्ये २५, टवलार येथे १६ आणि खेल तपमाळीत १९ कोरोना रुग्ण निघाले आहेत. देवमाळीत या १७ दिवसांत ७० कोरोना रुग्ण निघाले आहेत.
बॉक्स
मृतांच्या संख्येत घोळ
अचलपूर नगरपालिका क्षेत्रासह तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोना संक्रमितांचा मृत्यू उपचारादरम्यान होत आहे. या मृत्यूची माहिती जिल्हास्तरीय यंत्रणेकडून घोषितही केली जात आहे. पण, स्थानिक यंत्रणेकडे याची नोंद दिसून येत नाही. स्थानिक यंत्रणेकडून दिले जात असलेले मृतांचे आकडे अत्यल्प आहेत. यात हे आकडे स्थानिक यंत्रणेकडून लपविले जात असल्याची शंका व्यक्त होत आहे.