सावधान! बोगस बियाणे बाजारात
By Admin | Updated: March 15, 2015 00:39 IST2015-03-15T00:39:29+5:302015-03-15T00:39:29+5:30
शेती संबंधित सर्व घटकांमध्ये बियाणे हा महत्त्वपूर्ण घटक आहे. सोयाबीनने सलग तीन वर्षे निराश केल्यामुळे यंदा कपाशीच्या किमान ५० हजार हेक्टर...

सावधान! बोगस बियाणे बाजारात
गजानन मोहोड अमरावती
शेती संबंधित सर्व घटकांमध्ये बियाणे हा महत्त्वपूर्ण घटक आहे. सोयाबीनने सलग तीन वर्षे निराश केल्यामुळे यंदा कपाशीच्या किमान ५० हजार हेक्टर क्षेत्रात वाढ होण्याची चिन्हे आहेत. खरिपाचा हंगाम तोंडावर असताना बाजारात बोगस बियाण्यांचा शिरकाव झाला असून शेतकऱ्यांनी सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.
शेतकरी बाजारातील उपलब्धतेनुसार वाणाची निवड करतात. यामध्ये त्यांची फसगत होते. अलिकडे बाजारात राऊंडअप विडगार्ड, तनावरची बिटी आदी बोगस बियाण्यांचा शिरकाव झाला आहे. त्यामुळे बियाणे खरेदी करताना शेतकऱ्यांनी सावध राहण्याचा सल्ला कृषी विभागाद्वारे दिला जात आहे. खरिपाच्या गेल्या हंगामात जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बोगस बियाण्यांचा शिरकाव झाला होता. यावर्षी देखील हा प्रकार घडण्याची शक्यता आहे.
टॅग, लेबल पाहूनच करावी खरेदी
बियाण्यांच्या पिशवीवरील टॅग बघूनच बियाणे खरेदी करावे. या टॅगवरील लॉट नंबरवरुन त्या बियाण्यांची निर्मिती करणारे राज्य व बियाणे निर्मितीची तारीख कळते. त्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक टाळता येते. लेबल नसलेले बियाण्यांचे पाकीट खरेदी केल्यास फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
बियाणे खरेदी करताना
ही घ्यावी काळजी
अधिकृत परवानाधारक दुकानदारांकडून कपाशी बियाण्यांची खरेदी करावी.
बियाणे खरेदी केल्यावर त्याचे पक्के बिल न चुकता घ्यावे.
कपाशी बियाण्यांच्या पाकिटावरील सरकारमान्य चिन्ह तपासून घ्यावे.
बोलगार्ड-१ मध्ये उपलब्ध वाण ८३० रुपये व बोलगार्ड-२ मधील वाणांची ९३० रुपये या शासनमान्य दरानेच खरेदी करावी.
सरकारमान्य बोलगार्डचे चिन्ह व बोलगार्ड २ चिन्हासोबत दोन उभ्या गुलाबी रेषा तपासून घ्याव्यात.
दुकानदार पक्की पावती देत नसल्यास १८००२३३४००० या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा.