सावधान! भेसळयुक्त मिठाई बाजारात
By Admin | Updated: October 1, 2015 00:19 IST2015-10-01T00:19:16+5:302015-10-01T00:19:16+5:30
गणेशोत्सव नुकताच आटोपला आहे तर नवरात्रोत्सव आणि दिवाळी- दसऱ्याचे वेध अंबानगरीला लागले आहेत.

सावधान! भेसळयुक्त मिठाई बाजारात
एफडीएची करडी नजर : सण-उत्सवात लाखोंची उलाढाल
संदीप मानकर अमरावती
गणेशोत्सव नुकताच आटोपला आहे तर नवरात्रोत्सव आणि दिवाळी- दसऱ्याचे वेध अंबानगरीला लागले आहेत. सणासुदी दरम्यान मिठाई, दुग्धजन्य पदार्थांची मोठी उलाढाल असते. ग्रामीण भागातही मिठाईला मोठा उठाव असतो. या पार्श्वभूमिवर मिठाई उत्पादक व विक्रेते मोठ्या प्रमाणात भेसळ करतात. यंदाही हा प्रकार होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने अशा भेसळयुक्त पदार्थांवर आता ‘एफडीए’च्या अधिकाऱ्यांची नजर राहणार आहे.
अन्न व सुरक्षा मानके कायद्यांतर्गत खाद्यपदार्थात भेसळ करणे, निकृष्ट दर्जाच्या खाद्य पदार्थांची विक्री करणे हा गुन्हा आहे. परंतु खव्यात रवा मिसळणे, साखर मिश्रित खव्याची विक्री, खव्यात स्टार्च पावडर मिसळणे, असे प्रकार घडण्याची शक्यता असते. तसे प्रकार अनेकदा उघडकीसही आले आहेत. ही भेसळ आरोग्याला धोकादायक असते. त्यामुळे सणासुदीच्या दिवसांत ही भेसळ ओळखण्याच्या क्लृप्त्या नागरिकांनी शिकून घेतल्यास भेसळयुक्त पदार्थांपासून बचाव करता येणे शक्य आहे.
अशी ओळखा खव्यातील भेसळ
खव्यातील भेसळ घरच्या घरी ओळखण्याकरिता खव्यामध्ये आयोडीनयुक्त रसायन मिसळता येईल. खव्यात स्टार्च मिसळले असेल तर आयोडीन व स्टार्चच्या संयोगातून निळा रंग येतो. चमचाभर खवा घेऊन अशी प्रक्रिया केल्यास घरच्या घरी भेसळयुक्त खवा ओळखता येऊ शकतो. त्याचप्रमाणे डालडा, बेसन, दूध आणि इतर खाद्यपदार्थांवरही अन्न व सुरक्षा अधिकाऱ्यांची नजर आहे. अनेक ठिकाणी धाडी टाकून नमूने घेऊन ते प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात येतील, असे सहाय्यक आयुक्त मिलिंद देशपांडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
अॅल्युमिनिअम कॉईल आरोग्यास हानिकारक
मिठाईमध्ये अखाद्य रंगांचा उपयोग करण्यावर बंदी आहे. परंतु मिठाईची उत्कृष्ट सजावट करण्याकरिता विक्रेते या रंगांचा सर्रास उपयोग करतात. मिठाईवर ‘सिल्व्हर कोटींग’ करताना अॅल्युमिनिअम (चमकीचा कागद) कॉईल वापरले जाते. तो आरोग्यासाठी घातक आहे.
दुधातही होऊ शकते भेसळ
अमरावती शहरात दुधातही मोठ्या प्रमाणात भेसळीचे प्रमाण पुढे आले आहे. स्टोअरेजमध्ये दुधातील अॅसिडचे प्रमाण वाढते. त्यामुळे दूध कोल्ड स्टोरेजमध्ये साठवून ठेवणे गरजेचे असते. दूध नासू नये म्हणून त्यात अल्कली सोडा वापरला जातो. तो आरोग्यास घातक आहे. एसएनएफ (सोलीड नॉट फॅट) वाढावे म्हणून दुधात साखर मिसळली जाते.