सावधान ! घरात घुसून पाकिटातील पैसे लंपास करणारी टोळी सक्रिय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2016 00:17 IST2016-11-10T00:17:06+5:302016-11-10T00:17:06+5:30
महाविद्यालयात शिक्षण घेणारे हजारो विद्यार्थी गाडगेनगर परिसरात रुम भाड्याने घेऊन वास्तव्यास आहेत.

सावधान ! घरात घुसून पाकिटातील पैसे लंपास करणारी टोळी सक्रिय
गाडगेनगरातील अनेकांना गंडविले :विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण
अमरावती : महाविद्यालयात शिक्षण घेणारे हजारो विद्यार्थी गाडगेनगर परिसरात रुम भाड्याने घेऊन वास्तव्यास आहेत. नेमकी ही बाब हेरुन विद्यार्थ्यांच्या घरात घुसून पॉकीट, पैसे, मोबाईल व अन्य साहित्य चोरणारी टोेळी सक्रीय झाली असून या टोळीने अनेक विद्यार्थ्यांना गंडविल्याच्या घटना घडल्या आहेत.
विद्यार्थ्यांना गंडविल्याच्या घटना घडल्यानंतर याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार अथवा बयाण देणे याबाबीपासून दूर राहणे ते पसंत करतात. याप्रकरणी गाडगेनगर पोलिसात तक्रार झाली नसलीे तरी काही विद्यार्थ्यांनी नाव न प्रकाशित करण्याच्या अटीवर ‘लोकमत’कडे आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
गाडगेनगरात एका रुम मध्ये दोन ते तीन विद्यार्थी राहतात. येथील अनेक नागरिकांनी विद्यार्थ्यांसाठी रुम बांधून प्रति विद्यार्थी याप्रमाणे भाड्याने देण्याचा व्यवसाय थाटला आहे. भाड्याच्या रकमेपोटी घरमालकांनी आठ ते दहा खोल्या बांधल्या आहेत. एका घरमालकाकडे २० ते २५ विद्यार्थी वास्तव्यास आहेत. हीच संधी साधून काही अज्ञात तरुण चोरटे खोल्यांमध्ये प्रवेश करतात. नवीन विद्यार्थी असल्यामुळे आपसात अनेकांची ओळख नसते. त्यामुळे हा चोरटा नेमका कुणाकडे आला आहे. कुणाचा मित्र आहे. हे कळण्याचा आतच तो डल्ला मारुन आपला हात साफ करतो. महिन्याभरात तीन ते चार विद्यार्थ्यांसबोत हा प्रकार घडला आहे. मंगळवारी सायंकाळी एका विद्यार्थ्यांचे पॉकीट चोरीला गेले. त्यामध्ये हजार रुपये, वाहन परवाना, पॅन कार्ड व आधार कार्डसह महत्वाचे कागदपत्रं होती. चोरीच्या घटनेमुळे दर्यापूर येथे राहणाऱ्या विद्यार्थ्याला मनस्ताप सहन करावा लागला. या विद्यार्थ्याची परीक्षा सुरु असल्यामुळे त्याने पोलिसांत तक्रार देणे नाकारले. असाच प्रकार काही दिवसापूर्वी असाच प्रकार यापूर्वीही या परिसरात विद्यार्थ्यांसोबत घडला आहे. पोलिसात तक्रार दिली जात नसल्याने चोरट्यांचे फावत आहे.
घरमालकांनी खोली भाड्याने देताना काळजी घ्यावी
घराचे बांधकाम करायचे व नुसते विद्यार्थ्यांसाठी रुम काढायचे व त्यांना प्रती विद्यार्थी या प्रमाणे खोल्या भाडयाने द्यायच्या हा गाडगेनगरात अनेकांचा व्यवसाय झाला आहे. त्यामुळे त्या विद्यार्थ्याला आपण खोली भाडयाने देतो त्यांच्यावर लक्ष ठेवणे ही घरमालकाचीही तितकीच जबाबदारी आहे. त्यामुळे अनोखळी युवकांना खोली भाड्याने देऊ नये त्यांच्यावर सुक्ष्म लक्ष ठेवणे गरजेचे आहे. खातरजमा केल्यानंतरच त्याला खोली भाड्याने द्यावी.