रणरागिणींचा लढा पेटला
By Admin | Updated: May 23, 2015 00:31 IST2015-05-23T00:31:30+5:302015-05-23T00:31:30+5:30
तरिदेखील एक्साईज दारु विक्रेत्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्या महिलांनी केला.

रणरागिणींचा लढा पेटला
अमरावती : तरिदेखील एक्साईज दारु विक्रेत्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्या महिलांनी केला. या दारु विक्रीच्या दुकानाबाबत होत असलेले राजकारण, प्रशासन स्तरावर दिरंगाई या सर्व बाबी परिसरातील महिलांनी आ. राणा यांच्या समोर विषद केल्यात. लोकभावनेला साद देत आ. रवी राणा यांनी शुक्रवारी आपण स्वत: हे दारु विक्रीचे दुकान बंद करु, असा शब्द महिलांना दिला होता. त्यानुसार भाजीबाजार परिसरात असलेल्या गणपती मंदिरातून या आंदोलनाला प्रारंभ करण्यात आला. आ. राणा यांच्या नेतृत्वात असंख्य महिला, पुरुष ढोल ताशांचा गजर करत पायी चालत आले. थेट दारु विक्रीच्या दुकानावर धडक दिली. मात्र या दारु दुकानाविरुद्ध आंदोलन होणार असल्याची माहिती पोलिसांनी मिळताच तत्पुर्वी हे दुकान बंद करण्यात आले होते, हे विशेष. कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात होता. काही वेळ आ. राणा यांच्या नेतृत्त्वात महिलांनी बंद असलेल्या दारु दुकानासमोर आंदोलन केले. दरम्यान एक़्साईजच्या अधिकाऱ्यांनी बंद असलेले दारुचे दुकान उघडले तेंव्हा आंदोलक महिलांनी दुकानाच्या आत धडक दिली. यावेळी पोलिसांची एकच तारांबळ उडाली. अखेर आ. राणा यांनी आंदोलक महिलांची समजूत घातली. या दुकानाला टाळे लावण्याची कारवाई होत असून थोडे शांत होण्याचा सल्ला दिला. त्यानंतर दारुबंदीच्या मागणीसाठी आक्रमक होणाऱ्या महिला काहीशा शांत झाल्यात. दुकानाचे शटर लावून आ. राणा यांच्यासह एक्साईचे अधिकारी, पोलीस अधिकाऱ्यांनी दारुच्या बाटल्या मोजून त्या सील केल्या. त्यानंतर दारु विक्रीच्या दुकानाला टाळे लावण्याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना पाठविण्याची कारवाई करण्यात आली. दुकानाला टाळे लागताच महिलांनी एकच जल्लोष केला. ढोल ताशाच्या गजरात युवकांनी नाचून आनंदोत्सव साजरा केला. या आंदोलनात कुंदा अनासाने, शालीनी रत्नपारखी, कोकीळा सोनोने, अंजली पाठक, रश्मी उपाध्ये, लता राजगुरे, चंद्रकला फणसे, उषा साऊरकर, रेखा दवंडे, शोभा खेडेकर, माया करुले, निमल करुले, संजय हिंगासपुरे, शैलेंद्र कस्तुरे, नितीन बोरेकर, अजय बोबडे, बबन रडके, सचिन कोराट, चंद्रकांत जावरे, लखन राज, हरिष साऊरकर, आकाश राजगुरे आदी सहभागी होते.
बाटलीतील दारु रिकामी करताच झाला जल्लोष
दारु दुकानाला टाळे लावण्याची कार्यवाही पूर्ण होताच दुकानाबाहेर येऊन आ. रवी राणा आणि त्यांच्या समर्थकांनी बाटलीतील दारु रिकामी करुन हे दुकान बंद झाल्याची घोषणा केली. यावेळी एकच जल्लोष करताना आ. राणा यांच्या समर्थनार्थ नारेबाजी करण्यात आली. तर दुसरीकडे महिला आंदोलकांच्या हातात असलेल्या बाटलीतून दारु रिकामी होत असतानाचे बघून काही अंतरावर असलेल्या दारुड्यांचा जीव कासावीस होताना पाहावयास मिळाला.
राणांच्या आंदोलनाने दुसरेही दुकान बंदच्या मार्गी?
आ. रवी राणा यांनी लोकभावनेचा आदर आणि महिलांची मागणी लक्षात घेता यापूर्वी स्थानिक फ्रेजरपुरा स्थित देशी दारु विक्रीचे दुकानाविरुद्ध आंदोलन उभारले होते. हे दुकान फ्रेजरपुऱ्यातून हद्दपार करण्यात त्यांना यश मिळाले. आता भाजीबाजारातील दारु विक्रीच्या दुकानाविरुद्ध आंदोलन सुरु केले आहे. तुर्तास दारु विक्रीचे दुकानाला टाळे लावण्यात आले असले तरी जिल्हा प्रशासन याबाबत कोणता निर्णय घेतात, हे लवकरच स्पष्ट होईल.