धान्याची आधारभूत किंमत कागदावरच
By Admin | Updated: December 15, 2014 22:49 IST2014-12-15T22:49:18+5:302014-12-15T22:49:18+5:30
ऊन, वारा, पाऊस, वादळाचा सामना करीत शेतकऱ्यांनी पिकविलेल्या धान्यासाठी शासनाने जाहीर केलेली आधारभूत किंमत केवळ कागदावरच राहिली आहे. खासगी व्यापाऱ्यांना आधारभूत किमतीने धान्य

धान्याची आधारभूत किंमत कागदावरच
अमरावती : ऊन, वारा, पाऊस, वादळाचा सामना करीत शेतकऱ्यांनी पिकविलेल्या धान्यासाठी शासनाने जाहीर केलेली आधारभूत किंमत केवळ कागदावरच राहिली आहे. खासगी व्यापाऱ्यांना आधारभूत किमतीने धान्य खरेदी करण्याच्या सूचना असल्या तरीही व्यापाऱ्यांद्वारा या सूचनांना केराची टोपली दाखविण्यात येते व कमी भावात धान्याची खरेदी करण्यात येते. त्यामुळे शासनाने जाहीर केलेली धान्याची आधारभूत किंमत केवळ शेतकऱ्यांच्या समाधानासाठीच आहे काय, असा सवाल संतप्त शेतकऱ्यांचा आहे.
शासनाने शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळवून देण्यासाठी खरीप व रबी हंगामातील ज्वारी, बाजरी, मका, तूर, उडीद, कापूस, सोयाबीन, मूग, हरभरा व गहू या धान्याची आधारभूत किंमत जाहीर केली. खरीप व रबी हंगामात आधारभूत किमतीमध्ये धान्य खरेदी करण्याच्या सूचना व्यापाऱ्यांना दिल्यात. त्यासाठी सहकारी संस्थांच्या सहायक निबंधकाची मदत घेण्यात आली. परंतु ग्रामीण भागात व तालुक्याच्या ठिकाणी या सूचनेला केराची टोपली दाखविण्यात आली आहे. जिल्ह्यात दुष्काळ जाहीर झाल्याने शासनाने गावपातळीवरील या धान्य खरेदीकडे गांभीर्याने घेऊन शेतकऱ्यांचे धान्य आधारभूत किंमतीमध्येच व्यापाऱ्यांद्वारा खरेदी केल्या गेली पाहिजे याची दक्षता घेणे गरजेचे आहे.