आधारवड कोसळला
By Admin | Updated: July 26, 2015 00:41 IST2015-07-26T00:41:01+5:302015-07-26T00:41:01+5:30
राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या कर्तृत्वाची पताका फडकविणारे दादासाहेब गवई हे सूर्यभानजी व सरुबाई गवई

आधारवड कोसळला
राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या कर्तृत्वाची पताका फडकविणारे दादासाहेब गवई हे सूर्यभानजी व सरुबाई गवई यांच्या घरी दिवाळीतील लक्ष्मीपूजनाच्या दिवशी म्हणजे ३० आॅक्टोबर १९२९ रोजी वैभव, ज्ञान, समृध्दी घेऊन जन्माला आले. दादासाहेब गवई यांचा जन्म दर्यापूर तालुक्यातील दारापूर या छोट्याशा गावी झाला. आपल्या परम मित्राच्या आनंदात वाटेकरी होण्यासाठी सूर्यभानजींचे मित्र कुंजीलाल भैया यांनी चक्क बंदुकीचे बार हवेत उडविले. खोलापूर येथे ५ व्या वर्गापासून त्यांचे शालेय शिक्षण झाले. पूर्णेला पूर आला असला तरी ते नदीतून पुरातून पोहून शाळेत जात असत. त्यांचे पुर्णानदीवर अपार प्रेम. म्हणूनच त्यांनी मुंबई येथील घराला पूर्णा हे नाव दिले.
राजकारणात उत्तुंग शिखर गाठणारे दादासाहेब व्यक्ती म्हणूनसुध्दा प्रसन्न आणि आकर्षक व्यक्तिमत्त्वामुळे व दयाळू स्वभावामुळे सार्वांमध्ये प्रिय होते. सर्वांकडेच त्याचे लक्ष असते. ड्रायव्हरपासून तर अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांचीच ते आस्थेने चौकशी करायचे. आपल्या पोशाखात निटनेटकेपणा व साधेपणा असावा यावर त्यांचा कटाक्ष असायचा. त्यांना गबाळेपणा खपत नसे. मागासवर्गीय समाजात जन्म घेऊन सोज्वळ वाणी, उच्च राहणीमान, अभ्यासू वृत्ती, गरिबांबद्दल आस्था या गुणांमुळे ते सर्वांना हवेव्हवेसे वाटत राहिले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर नितांत श्रध्दा ठेवणाऱ्या दादासाहेबांनी सातत्याने सकारात्मक विचारांची कास धरली. त्यामुळे वैचारिक मतभेद असले तरी दादासाहेबांचे कुणासाबत मनभेद झाले नाहीत. समाजाच्या उन्नतीसाठी घटनादत्त मार्गाने यांनी लढा दिला. महिमापूर येथील विहीर खुली करण्याचा लढा असो अथवा इतर प्रश्न, त्यांनी त्यात कुशल नेतृत्वाने यश मिळविले. मागासवर्गीय व तळागाळांतील व्यक्तींसाठी कार्यरत असताना त्यांनी इतर जातींचा द्वेष केला नाही. नकारात्मक विचारसरणी असणाऱ्या लोकांना त्यांनी कधीही प्रतिसाद दिला नाही. दीक्षाभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष म्हणून अद्विलीय अशा स्मारकाची उभारणी करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. जागतिक बौध्द महासंघाचे उपाध्यक्ष म्हणून आपल्या कर्तृत्वाची छाप सोडली. राजकारणात ३० वर्षांपर्यंत आमदार, विधानपरिषदेतील सभापती, विरोधी पक्षनेते अशी विविध पदे त्यांनी जबाबदारीने सांभाळली. केंद्रात लोकसभा व राज्यसभा दोन्ही सभागृहांंचे सदस्य म्हणून त्यांनी चमकदार कामगिरी केली. राष्ट्राच्या विदेशी नीतीपासून अनेक राष्ट्रीय प्रश्नांवर संसदेत अत्यंत प्रभावी भाषणे केलीत. शौरी यांनी बाबासाहेबांवर लिहिलेल्या ६ङ्म१२ँ्रस्र्रल्लॅ ङ्मा ३ँी ां’२ी ॅङ्म िह्या पुस्तकातील आक्षेपार्ह लिखाणाचा तीव्र निषेध त्यांनी केला. संसदेचे कामकाज त्यामुळे दोन दिवस तहकूब झाले. विधिमंडळात त्यांनी राज्याचे, जिल्ह्याचे तालुक्याचे व आपल्या गावाचेही विस्मरण होऊ दिले नाही. अमरावती विद्यापीठाची स्थापना, अप्पर वर्धा धरण, अचलपूर येथील गिरणीसंदर्भात त्यांनी विधिमंडळात सातत्याने प्रश्न उपस्थित केलेत. शासनाच्या विविध समित्यांवर त्यांनी कार्य केले. रोजगार हमी योजना आज देशभरात अनुकरणीय ठरते आहे, त्यावर त्यांनी भरीव योगदान दिले.
डॉ. कमलतार्इंच्या रुपाने त्यांना संसारात समर्थ साथ लाभली. साहेब राजकारणात व्यस्त असताना तार्इंनी घराच्या जबाबदाऱ्या समर्थपणे पूर्ण केल्यात. मुलांचे शिक्षण व त्यांचे संगोपन सुसंस्कारी वातावरणात झाले. ज्येष्ठ पुत्र भूषण गवई हे उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आहेत. लहान डॉ. राजेंद्र गवई शिक्षणाने त्वचारोगतज्ज्ञ असून राजकारणात सक्रिय आहेत. कन्या कीर्ती त्यांच्या क्षेत्रात यशस्वी आहेत.
बिहारचे राज्यपाल म्हणून दादासाहेबांनी अत्यंत उत्कृष्ट कामगिरी बजावली. राज्यपाल म्हणून विद्यापीठाचे कुलपती असल्यामुळे बिहारमध्ये उच्च शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी त्यांनी मोलाचे प्रयत्न केले. बुध्दगया भागाचा विकास करण्यासाठी त्यांनी स्वत: लक्ष घातले. बिहारमधून केरळमध्ये स्थानांतर झाल्यावर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी त्यांचा जाहीर सत्कार केला. निरोपाचे वेळी मुख्यमंत्र्यांना आपले अश्रू आवरले नव्हते. तेथून केरळचे राज्यपाल म्हणून ते नियुक्त झालेत. तेथेही त्यांनी समर्थपणे जबाबदरी पेलली होती.
मात्र ही सर्व उच्चपदे भूषवित असतांना दारापूर या गावाचा त्यांना विसर पडला नाही. त्यांच्या प्रेरणेने श्री दादासाहेब चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्ष कमलताई गवई यांनी दारापूर येथे शिक्षणाची गंगा सांभाळली आहे. इंजिनियरिंगपासून तर इंग्लिश कॉन्व्हेंटपर्यंत अनेक शैक्षणिक संस्था दारापुरात स्थापन करून प्रत्येक प्रकारचे शिक्षण ग्रामीण जनतेकरिता उपलब्ध करुन दिले. दादासाहेबांनी आयुष्यभर अनेकांच्या डोळ्यांतील अश्रू पुसले. त्यांच्या दारात गेलेले दु:खी जण हसतच बाहेर आले आहेत. दादासाहेबांच्या जाण्याने लक्षावधी हृदयांचा जणू आधारवडच कोसळला आहे.
- डॉ. बाळकृष्ण अढाऊ, अमरावती.