भकास शासकीय बंगल्यांची होणार रंगरंगोटी
By Admin | Updated: July 28, 2015 00:24 IST2015-07-28T00:24:47+5:302015-07-28T00:24:47+5:30
शहरातील विविध शासकीय अधिकाऱ्यांचे बंगले भंगार अवस्थेत होते.

भकास शासकीय बंगल्यांची होणार रंगरंगोटी
प्रभाव लोकमतचा
अमरावती : शहरातील विविध शासकीय अधिकाऱ्यांचे बंगले भंगार अवस्थेत होते. यासंदर्भात ‘भकास बंगले’ या मथळ्याखाली ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याची दखल वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतली असून लवकरच शहरातील शासकीय बंगल्यांची साफसफाई आणि रंगरंगोटी करण्याचे आदेश वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संबंधितांना दिले आहेत.
शहराच्या कानाकोपऱ्यात शासकीय अधिकाऱ्यांचे बंगले आहेत. काही बंगले १०० वर्ष जुने आहेत. परंतु बंगल्याची निगा नीटनेटकी राखली जात नाही. त्यामुळे ‘लोकमत’ने शासकीय बंगल्याचे छायाचित्रासह वृत्त प्रकाशित केले होते. त्याची दखल विभागीय महसूल आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर यांनी घेतली आहे. त्वरित बंगल्याची साफसफाई करून रंग देण्याचे आदेश त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहेत. त्यामुळे शासकीय बंगल्याचे नवे रूप पाहण्यास मिळणार आहे. (प्रतिनिधी)