बोरगावचा रेतीघाट रद्द
By Admin | Updated: June 22, 2016 23:58 IST2016-06-22T23:58:50+5:302016-06-22T23:58:50+5:30
रेतीघाट लिलावधारकाने १० अटी व शर्तींचा भंग केल्याने व लिलावातील घाटाव्यतिरिक्त बाजूच्या सलामतपूर येथील रेतीघाटांमधूनही रेतीचे उत्खनन केल्याने...

बोरगावचा रेतीघाट रद्द
जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई: सहा घाटांना नोटीस
अमरावती : रेतीघाट लिलावधारकाने १० अटी व शर्तींचा भंग केल्याने व लिलावातील घाटाव्यतिरिक्त बाजूच्या सलामतपूर येथील रेतीघाटांमधूनही रेतीचे उत्खनन केल्याने जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी धामणगाव तालुक्यातील बोरगाव निस्ताने येथील रेतीघाट रद्द केल्याची कारवाई मंगळवारी सायंकाळी केली.
या रेतीघाट लिलावधारकाने नियमभंग केल्याने ही कारवाई करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. यामुळे खळबळ उडाली आहे.
लगतच्या जिल्ह्यांना जिल्हाधिकाऱ्यांचे पत्र
अमरावती : या व्यतिरिक्त जिल्ह्यातील अन्य सहा रेती घाट लिलावधारकांनी नियमभंग केला असल्याने त्यांच्यावर नोटिसेस बजावण्यात आलेल्या आहेत व प्रसंगी या लिलावधारकांचे रेती घाट देखील रद्द करण्यात येईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. पावसाळा सुरु झाल्याने शहरात रेतीचे साठा करण्याचे प्रयत्न होत आहेत. त्यामुळे रेतीची वाहतूक वाढली आहे. यासाठी पोलिस व प्रादेशिक परिवहन विभागाचे सहकार्य घेऊन कारवाई करण्याच्या सूचना यंत्रणेला दिल्या आहेत. जिल्हा सिमेलगत असणाऱ्या वर्धा व यवतमाळ जिल्ह्यातील रेती वाहतूकीची ओघ जिल्ह्यात वाढला आहे. याविषयी तेथील जिल्हाधिकारी यांना पत्र देवून अवगत केलेले आहे. जिल्ह्यातील गोकुळसरा, आष्टा, दिघी महल्ले,
चिंचोली (मरामाय), सोनोरा काकडे, वकनाथ, विटाळा या घाटांविषयी तक्रारी असल्याने तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा खनिकर्म अधिकारी शिरीष नाईक यांनी दिली. (प्रतिनिधी)
जप्त केलेला ट्रक वाळूमाफियांनी पळविला
कन्हान येथून रेती घेऊन येणाऱ्या एम.एच. ४० एन. १७३५ या ट्रकवर तिवसा तहसीलदार राम लंके यांनी कारवाई करुन ट्रक तहसीलचे आवारात जमा केला. तहसीलदार व्यस्त असल्याची संधी साधून वाळूमाफियांनी रात्री १ वाजताच्या सुमारास हा ट्रक पळविला. याची माहिती मिळताच तहसीलदारांनी पाठलाग केला. तिवसा येथून १० कि.मी. अंतरावरील वर्धा जिल्ह्यात ट्रक पळून गेला.