स्वयंपाकघरातून तांब्याची भांडी हद्दपार
By Admin | Updated: May 17, 2015 00:44 IST2015-05-17T00:44:12+5:302015-05-17T00:44:12+5:30
प्राचिन काळापासून वापरात असलेली तांब्याची भांडी अनेक घरांमधून हद्दपार झाली आहेत़ त्यांची जागा आता ..

स्वयंपाकघरातून तांब्याची भांडी हद्दपार
आरोग्यासाठी तांबे लाभदायक : आधुनिकतेमुळे वाढतोय स्टेनलेस स्टीलचा वापर
धामणगाव रेल्वे : प्राचिन काळापासून वापरात असलेली तांब्याची भांडी अनेक घरांमधून हद्दपार झाली आहेत़ त्यांची जागा आता स्टेनलेस स्टील व प्लॅस्टिकच्या भांड्यांनी घेतली आहे़ पूर्वी आरोग्य चांगले राहण्यासाठी तांब्याची भांडी मोठ्या प्रमाणात वापरली जात असत.
सद्यस्थितीत नव्या पिढीने जुना रेडिओ, टीव्ही, जुन्या लाकडी खुर्च्यासह अन्य जुनाट वस्त अडगळीत टाकल्या आहेत. त्याचप्रमाणे वडिलोपार्जित काळापासून वापरली जाणारी तांब्याची भांडी देखील हद्दपार करून आता स्टेनलेस स्टीलच्या भांड्यांचा वापर सर्रास सुरू झाला आहे़ सध्याच्या काळात केवळ गरजेपुुरताच तांब्याच्या भांड्यांचा वापर होताना दिसतो़ देवांसाठी तसेच धार्मिक कार्यात आजही आवर्जून तांब्याची भांडी वापरली जातात.
तांबे हा धातू बहुगुणी असून आरोग्यसाठी देखील तो अतिशय उत्तम असल्याचा उल्लेख आयुर्वेदात आहे़ तांब्याच्या भांड्यात रात्री पाणी भरून ते सकाळी उपाशीपोटी प्यायल्याने अनेक आजार नाहीसे होतात. प्राचिन काळापासून चालत आलेल्या तांब्याच्या भांड्यांच्या वापरावर विज्ञानानेही शिक्कामोर्तब केले आहे़
तांब्याच्या वस्तुंवर विषाणुंची संख्या नव्वद ते शंभर टक्क्यांनी कमी असल्याचे वैज्ञानिक संशोधनात दिसून आले आहे़ अलिकडे मात्र दैनंदिन वापरात स्टील, लोखंड, प्लास्टिकचा वापर वाढला आहे. या वस्तुंवर मोठ्या प्रमाणात विषाणू जमतात़ खाद्यान्नाच्या माध्यमातून ते शरीरात मोठ्या प्रमाणात प्रवेश करून रोगप्रतिकारक शक्तींवर हल्ला करतात़ यामुळे व्यक्ती आजारी पडतात़
स्टीलच्या भांड्यांपेक्षा तांब्याचा वापर अधिक होत असलेले स्वयंपाकघर जीवाणुंपासून अधिक सुरक्षित असते़ विज्ञान निरीक्षणानुसार सामान्य तापमानाला तांब्याच्या भांड्यातील जीवाणू चार तासात मरतात़ तर स्टीलच्या भांड्यात ते एक महिन्यापेक्षा अधिक काळ जीवंत राहतात़
आयुर्वेदानुसार नियमितपणे तांब्याच्या भांड्यातील पाणी प्राशन केल्यास माणसाचे शरीर तंदुरूस्त राहाते आणि आम्लपित्त, विविध चर्मरोग, सांध्यांचे दुखणे आदी तक्रारीपासून सहज मुक्ती मिळते़ आयुर्वेदात तांब्याचे जलपात्र उत्तम मानले जाते़ त्या खालोखाल मातीचे जलपात्र चांगले मानले आहे़
पोटाच्या तक्रारी असणाऱ्यांनी तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यावे, अपचन, भूक न लागणे, बध्दकोष्ठता, अल्सर, आदी तक्रारी असणाऱ्यांना तांब्याच्या भांड्यातील पाणी पिल्याने लाभ होतो़ तारूण्यापिटीकांची समस्या देखील दूर होते. चेहऱ्याची कांती सुधारण्यास यामुळे मदत होते़ तांबे हे खाद्यपदार्थातील विषाणुंचा नायनाट करते़ तर पेशींमधील विषद्रव्ये तयार होण्यापासून रोखते. यामुळे जीवाणुंना जिवंत राहणे अवघड बनते़ मात्र, आज बहुतांश घरांच्या स्वयंपाकघरातून स्टेनलेस स्टीलचा वापर वाढला आहे. देव्हाऱ्यात पूजेसाठी एखाददुसरे तांब्याचे भांडे आढळून येते. इतर ठिकाणी स्टिल आणि प्लास्टिकचा वापरच केला जातो. वास्तविक सद्यस्थितीत तांब्याच्या भांड्यांना चांगला दर आहे़ त्यामुळे अशी वाडवडिलांपासून घरात अडगळीत ठेवलेली तांब्याची भांडी मोडीत देऊन नवीन स्टेनलेस स्टीलची भांडी घेण्याच आजच्या पिढीचा कल आहे़
तांब्याच्या भांड्यांचा आरोग्यदायी उपयोग अनेकांना माहितच नसल्याने तांब्याची भांडी वापरणे आजकाल कालबाह्य समजले जाते. आरोग्य संवर्धनासाठी नाना प्रयोग करणाऱ्या आजच्या पिढीने तांब्याचे महत्त्व समजून घेऊन दैनंदिन जीवनात त्याचा वापर करण्याची गरज आहे़ तांब्याला कालबाह्य न समजता त्याचा वापर अधिकाधिक कल्पकतेने करण्याची गरज आहे.