पाऊस घेऊन आले बाप्पा !

By Admin | Updated: September 18, 2015 00:08 IST2015-09-18T00:08:15+5:302015-09-18T00:08:15+5:30

विघ्नहर्ता गणपती बाप्पा आले...वाजत-गाजत, ढोलताशांच्या गजरात गणरायाचे आमगन झाले. विघ्नहर्ताच तो.

Bappa brought rain! | पाऊस घेऊन आले बाप्पा !

पाऊस घेऊन आले बाप्पा !

शेतकरी सुखावला : गणेशोत्सव मंडळाची उडाली तारांबळ
अमरावती : विघ्नहर्ता गणपती बाप्पा आले...वाजत-गाजत, ढोलताशांच्या गजरात गणरायाचे आमगन झाले. विघ्नहर्ताच तो. शेतकऱ्यांचे आणि सामान्यांची व्यथा ओळखून बाप्पा सोबत पाऊसही घेऊन आलेत. चराचरात चैतन्य फुलविणारा, बळीराजाच्या आशा पल्लवीत करणाऱ्या पावसाच्या विघ्नहर्त्याच्या भक्तांमध्ये उत्साह संचारला नाही तरच नवल. म्हणूनच भर पावसातही जिल्ह्यातील १६५६ मंडळांनी उत्साहात गणरायाची प्रतिष्ठापना केली.
गुरुवारी श्रीगणेशाची स्थापना करायची असल्याने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची लगबग चालली होती. परंतु गुरूवारी सकाळी ७ वाजतीपासूनच पावसाने हजेरी लावल्याने गणेशभक्तांच्या उत्साहावर विजरण पडले. येथील नेहरु मैदान, राजापेठ, नवाथेनगर, गांधी चौक, गाडगेनगर, पंचवटी, फरशी स्टॉप, यशोदानगर, दस्तूरनगर, सायन्सस्कोर मैदान, रवीनगर, कठोरा नाका, बडनेरा आदी ठिकाणी गणरायाच्या आकर्षक व देखण्या मूर्ती विक्रीसाठी उपलब्ध होत्या. पावसामुळे विक्रेत्यांची आणि भक्तांची देखील तारांबळ उडाली.
येथील आझाद हिंद मंडळ, श्रीकृष्णपेठ गणेशोत्सव मंडळ, निळकंठ मंडळ, राजापेठ स्पोर्र्टींग क्लब, लक्ष्मीकांतमंडळ, रुक्मिणीनगर मंडळ, टोपेनगर मंडळ, राधानगर गणेशोत्सव मंडळ, पंचशिल गणेशोत्सव मंडळ, नवीन कॉटन मार्केट येथील शेतकरी राजा मंडळ आदी प्रमुख मंडळाच्या आयोजित शोभायात्रेवर पावसामुळे विरजण पडले. काही मंडळांनी शोभायात्रा रद्द करण्याचा निर्णय घेतला. पोलीस प्रशासनाने सुरक्षिततेसाठी तगडा बंदोबस्त ठेवला होता. राज्य राखीव दलाची तुकडी, शेकडो पोलीस दिमतीला होते. पोलीस आयुक्त राजकुमार व्हटकर, जिल्हा पोलीस अधीक्षक लखमी गौतम बारकाईने लक्ष ठेऊन होते.

परतीच्या पावसाने खरिपाला दिलासा
तब्बल ३६ दिवसाच्या खंडानंतर सार्वत्रिक आलेल्या पावसाने खरीप पिकांना दिलासा मिळाला आहे. शेंगावर असणाऱ्या सोयाबीनला पावसाने फायदा होणार आहे. वाढ खुंटलेल्या कपाशी व तुरीला हा परतीचा पाऊस संजीवन देणारा ठरला आहे. सोयाबीनला पावसाची नितांत गरज असताना ३६ दिवसाच्या दडीनंतर पाऊसाचे आगमन झाले. सध्या जिल्ह्यातील सोयाबीन शेंगावर आहे. यावेळी शेंगा भरण्यासाठी पावसाची आवश्यकता असताना परतीच्या पावसाने गुरूवारपासून कमी अधिक प्रमाणात सार्वत्रिक स्वरूपात उपस्थिती लावली. यामुळे सोयाबीन पिकाला काहीअंशी दिलासा मिळाला आहे.

Web Title: Bappa brought rain!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.