बँका बंद, शेतकरी वेठीला
By Admin | Updated: May 19, 2015 00:40 IST2015-05-19T00:40:57+5:302015-05-19T00:40:57+5:30
खरीप हंगाम तोंडावर आला आहे, शेती मशागत, पेरणीपूर्व कामे, बी-बियाणे-खते यांची लगबग सुरू झाली आहे.

बँका बंद, शेतकरी वेठीला
खरीप हंगाम तोंडावर : उलाढाल थांबली, शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी
अमरावती : खरीप हंगाम तोंडावर आला आहे, शेती मशागत, पेरणीपूर्व कामे, बी-बियाणे-खते यांची लगबग सुरू झाली आहे. मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून शेतकऱ्यांची खरीप पीक कर्जाची धावपळ सुरू होते. यंदा मात्र नापिकीमुळे प्रचंड आर्थिक अडचणीत असलेला शेतकरी बँक कर्मचाऱ्यांचा संप व व्यवस्थापनाची ताठर भूमिका यामुळे वेठीला धरल्या जात आहे. शेतकऱ्यांची बँक म्हणून ओळखली जाणारी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सर्व शाखांचे कामकाज तब्बल आठ दिवसापासून बंद असल्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे.
मागील २०१४-१५ च्या हंगामात ५० पैस्याच्या आत जिल्ह्याची पैसेवारी असल्याने शासनाने टंचाई स्थिती जाहिर केली. जिल्हा बँकेने शेतकऱ्यांना ४३४९४ लाख रूपयांचे कर्जवाटप केले होते.
दुष्काळी परिस्थितीमुळे या कर्जाचे तीन वर्षात समान हप्त्यात पुनर्गठन करून नव्याने खरीपाचे पीक कर्ज द्यावे असे शासनाचे आदेश आहेत. खरीपाच्या पीक कर्जावरील तीन महिन्याचे व्याज शासनाद्वारा शेतकऱ्यांना माफ करण्यात आले. यंदाच्या हंगामात खरीपाचे पीक कर्जाची प्रक्रिया बँकेचे कामकाज बंद असल्यामुळे रखडली आहे. २०१५-१६ च्या खरीप-रबी हंगामासाठी जिल्हा बँकेला दिले आहे. बँकेला कर्ज वाटपासाठी कोरडवाहू कापसाला दर हेक्टरी ३५ ते ४४ हजारापर्यंत पीक कर्जदर जिल्हा तांत्रिक गट समितीने मंजूर केले आहे.
बागायती कापसाकरिता ४० ते ४९ हजार, संकरीत ज्वार १९ ते २२ हजार, तूर २४ ते २६ हजार, सोयाबीन ३० ते ३५ हजार, मूग २० ते २४ हजार, उडीद २० ते २४ हजार असे दर निश्चित केले आहे. जिल्हा बँकेने १५ एप्रिल २०१५ पर्यंत २५ हजार ९७१ शेतकऱ्यांना २ कोटी १८ लाख ८५ हजाराचे वाटप केले आहे. खरे तर शेतकऱ्यांच्या खरीप पीक कर्जाची सुरुवात मे अखेरपासून सुरू होते. यंदा मात्र शेतकऱ्यांच्या बँकेने त्यांना वेठीस धरले आहे. (प्रतिनिधी)
शेतकऱ्यांना दिलगिरी, भूमिका मात्र ताठरच
जिल्हा बँक कर्मचाऱ्यांचा ११ मे पासून संप सुरू आहे, आठ दिवस झाले सर्व कामांचे कामकाज ठप्प, संघटना मागे हटायला तयार नाही, बँकेचे व्यवस्थापन तडजोडीस तयार नाही, दोन्ही बाजूंच्या भूमिका ताठरच आहे. यामध्ये शेतकरी, शिक्षक, ठेवीदार पिचल्या जात आहे. एक मात्र या दोन्ही बाजूकडून होते ती म्हणजे शेतकऱ्यांची दिलगिरी.
जिल्हा बँकेत व्यवस्थापनाची मंगळवारी बैठक होत आहे. याविषयीच्या सूचना त्यांना दिल्या आहे. संपाविषयी या बैठकीत चर्चा होईल. शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठन करून शेतकऱ्यांना त्वरीत पीक कर्ज द्यावे अशा सूचना सोमवारच्या बैठकीत दिल्या आहेत.
- गौतम वालदे
जिल्हा उपनिबंधक
(सहकारी संस्था)