बँकांनी 30 जूनपर्यंत पीककर्ज वाटप करावे
By Admin | Updated: April 7, 2016 00:03 IST2016-04-07T00:03:28+5:302016-04-07T00:03:28+5:30
जिल्ह्याला सन २०१६-१७ वषार्साठी २,९६,९९९ खातेदारांना २१४५ कोटी ६८ लक्ष रूपयांचे खरीप व रबी हंगामासाठी पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट आहे.

बँकांनी 30 जूनपर्यंत पीककर्ज वाटप करावे
विभागीय आयुक्त : बँक व्यवस्थापकांची कार्यशाळा
अमरावती : जिल्ह्याला सन २०१६-१७ वषार्साठी २,९६,९९९ खातेदारांना २१४५ कोटी ६८ लक्ष रूपयांचे खरीप व रबी हंगामासाठी पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट आहे. यामध्ये खरीप हंगामासाठी १७६९ कोटी ४५ लक्ष ७६ हजार रूपये तर रबीसाठी ३८६ कोटी २२ लक्ष २४ हजार रूपयांचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले आहे.
शेतकऱ्यांची तातडीची गरज लक्षात घेता सर्व बँक अधिकाऱ्यांनी एप्रिल-२०१६ पासूनच खरिपाच्या पीककर्ज वाटपाला सुरूवात करावी. जून-२०१६ पूर्वी ९० टक्के उद्दिष्ट पूर्ण करावे, असे निर्देश विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजुरकर यांनी दिलेत.
जिल्ह्यातील खरिपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी तसेच शेतकऱ्यांप्रती बँक कर्मचाऱ्यांनी संवेदनशील राहावे म्हणून सर्व बँकांच्या व्यवस्थापकांसाठी आयोजित कार्यशाळेचे उद्घाटन राजुरकर यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी किरण गीत्ते, सहनिबंधक संगीता डोंगरे, बँक आॅफ महाराष्ट्र पुणेचे सेवानिवृत्त महाप्रबंधक श्याम भुरके प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी जिल्हा उपनिबंधक गौतम वालदे, अग्रणी बँक प्रबंधक सुनील रामटेके, नाबार्डचे जिल्हा विकास प्रबंधक नारायण पौनीकर उपस्थित होते.