बँकांचा पालकमंत्र्यांना ‘दे धक्का’
By Admin | Updated: July 2, 2015 00:10 IST2015-07-02T00:10:04+5:302015-07-02T00:10:04+5:30
खरिपाच्या पेरणीला सुरुवात झाल्यावरही बँकांचा पीककर्ज वाटपाचा टक्का वाढत नसल्याची बाब पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी गांभीर्याने घेतली.

बँकांचा पालकमंत्र्यांना ‘दे धक्का’
शासन निर्देशाला ‘खो’ : ३० जून ‘डेडलाईन’पर्यंत ५० टक्केच पीककर्ज वाटप
गजानन मोहोड अमरावती
खरिपाच्या पेरणीला सुरुवात झाल्यावरही बँकांचा पीककर्ज वाटपाचा टक्का वाढत नसल्याची बाब पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी गांभीर्याने घेतली. २१ जून रोजी या संदर्भात आयोजित बैठकीत त्यांनी उपस्थित सर्व बँक अधिकाऱ्यांना ३० जूनच्या आत पीककर्ज वाटपाचे निर्देश दिले होते. मात्र, बँकांनी या आदेशांची अवहेलना करून पालकमंत्र्यांना ‘धक्का’ दिला आहे. ३० जूनपर्यंत सहकारी बँक, राष्ट्रीयीकृत बँका व ग्रामीण बँकांनी केवळ ५० टक्केच कर्जाचे रुपांतरण करुन कर्जवाटप केले आहे. विशेष म्हणजे पालकमंत्र्यांच्या बैठकीनंतर जिल्हा सहकारी बँक आहे त्याच टक्क्यावर स्थिरावली तर अन्य बँकांनी फक्त कर्जवाटपात ९ टक्क्यांनी वाढ केली आहे. जिल्ह्यात पेरणीयोग्य पाऊस पडल्यानंतर खरीप पेरणीला वेग आला आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात ५५ टक्क्यांवर पेरणी झाली आहे.
१५ जुलैपर्यंत कर्जरुपांतरणाचे आरबीआयचे निर्देश
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत २४ जून रोजी झालेल्या बैठकीनंतर भारतीय रिझर्व्ह बँकेने शेतीकर्जाचे रुपांतरण व पीककर्ज मंजूर करण्यासाठी १५ जुलैपर्यंत मुदत दिल्याचे पत्र भारतीय रिझर्व्ह बँकेचे असिस्टंट जनरल मॅनेजर डी.बी.व्ही.राजू यांनी पत्राद्वारे बँकांना कळविले आहे.
जिल्हा बँकेचे जून महिन्यात ५ टक्केच वाटप
शेतकऱ्यांची बँक म्हणविल्या जाणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने १ जूनपर्यंत ५३ टक्के कर्जवाटप केले होते. २० जूनपर्यंत ५७ टक्के तर ३० जूनपर्यंत ५८ टक्के पीककर्जाचे वाटप केले आहे. म्हणजेच जिल्हा बँकेने शेतकऱ्यांना गरज असताना जून महिन्यात केवळ ७ टक्केच कर्जवाटप केले आहे व ५८ टक्के कर्जवाटपावर जिल्हा बँक स्थिरावली आहे.
बुधवारी सकाळी जिल्हाधिकाऱ्यांशी यासंदर्भात चर्चा झाली. एक हजार कोटी रुपये पीककर्जाचे वाटप करण्यात आले. राष्ट्रीयीकृत बँकांनी कर्जवाटपाचा टक्का वाढविला आहे. परंतु जिल्हा बँकेचे कर्जवाटप मंदावले आहे. शनिवारी याविषयी बैठक बोलविण्यात आली आहे.
- प्रवीण पोटे, पालकमंत्री
कर्जाचे रुपांतरण व नव्याने कर्ज देण्यासाठी १५ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये एकेका शेतकऱ्याला तर सहकारी बँकेत एकाच वेळी शेकडो शेतकऱ्यांना कर्ज दिले जाते.
- अनंत खोरगडे, व्यवस्थापक,
जिल्हा अग्रणी बँक, सेंट्रल बँक आॅफ इंडिया
बँकांना कर्ज रुपांतरण व नव्याने पीक कर्ज मंजुरी करिता १५ जुलैपर्यंत मुदतवाढ दिली आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत ५० टक्के कर्जवाटप झाले असून वाटपाची प्रक्रिया सुरु आहे.
- गौतम वालदे
जिल्हा उपनिबंधक, (सहकारी संस्था)