आरोपींची बँक खाती गोठविली
By Admin | Updated: March 8, 2016 00:03 IST2016-03-08T00:03:12+5:302016-03-08T00:03:12+5:30
बँकेत बनावट धनादेश देऊन २२ लाख ६० हजारांनी फसवणूक करणाऱ्या तिन्ही आरोपींची बँक खाती आर्थिक गुन्हे शाखेने गोठविली.

आरोपींची बँक खाती गोठविली
२२.६० लाखांचे फसवणूक प्रकरण
अमरावती : बँकेत बनावट धनादेश देऊन २२ लाख ६० हजारांनी फसवणूक करणाऱ्या तिन्ही आरोपींची बँक खाती आर्थिक गुन्हे शाखेने गोठविली. धारणी येथील आदिवासी विकास विभागाच्या प्रकल्प कार्यालयाचे बनावट धनादेश प्रकरणातील मुख्य सूत्रधार सुदीप श्रीराम सोनी (४८,रा. महाल, नागपूर) याला आर्थिक गुन्हे शाखेने अटक करून न्यायालयासमोर हजर केले. त्याला ११ मार्चपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. त्याची कसून चौकशी केली जात आहे. त्यानंतर पोलिसांनी कळमेश्वर तालुक्यातील खुमारी मोहपा येथून विक्रम शशीकांत घोगरे (३५) व धारणी येथून दुर्योधन जावरकरला अटक केली. आतापर्यंत चार आरोपींना अटक करण्यात आली असून आणखी पाच ते सहा जणांचा सहभाग असल्याचा पोलिसांना संशय आहे.
बनावट धनादेश तयार
करण्याचे साहित्य जप्त
पोलिसांनी सुदीप सोनी या आरोपीच्या घरातून बनावट धनादेश तयार करण्याचे साहित्य जप्त केले आहे. त्यामध्ये संगणक, स्टॅम्प, शिक्के, स्कॅनर, मोबाईल चार्जर, कटर, रबर, प्लॅस्टिकची साचे, कोरे कागद आदींचा समावेश आहे.
नागपूर विद्यापीठाची फसवणूक ?
एका आरोपीने ३१ लाखांचा धनादेश यवतमाळ येथील कॅनरा बँकेतून वटविला होता. नागपूर विद्यापीठाच्या साडेचार हजारांच्या धनादेशाचा चुकीचा वापर करून ३१ लाखांच्या रकमेचा अपहार करण्यात आला. ही घटना महिन्याभरापूर्वीची असून त्याचा उपरोक्त आरोपींशी संबध आहे का? याचा शोध आर्थिक गुन्हे शाखा घेत आहे.