जंगलात खासगी वाहनांना बंदी
By Admin | Updated: June 8, 2015 00:37 IST2015-06-08T00:37:18+5:302015-06-08T00:37:18+5:30
वडाळी वनपरिक्षेत्रात वनाधिकाऱ्यांच्या परवानगीने खासगी वाहनांना जंगलात प्रवेश देण्यात येत असल्याचे वृत्त ...

जंगलात खासगी वाहनांना बंदी
वनाधिकाऱ्याला सूचना : वन्यप्राणी ट्रॅप कॅमेऱ्यात कैद
अमरावती : वडाळी वनपरिक्षेत्रात वनाधिकाऱ्यांच्या परवानगीने खासगी वाहनांना जंगलात प्रवेश देण्यात येत असल्याचे वृत्त 'लोकमत'ने प्रकाशित केले होते. वृत्ताची दखल घेऊन उपवनसंरक्षक निनू सोमराज यांनी खासगी वाहनांना प्रवेश बंदी लागू करण्याच्या सूचना वनाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
वडाळी वनपरिक्षेत्रातील जंगलात शहरातील गणमान्य नागरिक वनाधिकाऱ्यांच्या परवानगीने निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेण्याकरिता जात होते. जंगलात खासगी वाहने जात असल्यामुळे वन्यप्राण्यांच्या अधिवासाला धोका निर्माण झाला होता. वाहनाच्या आवाजाने वन्यप्राणी भयभीत होऊन अधिवास सोडून पळून जाण्याची भीती असते. हा प्रकार वनाधिकाऱ्यांच्या परवानगीने होत असल्याने नागरिकांची वर्दळ वाढल्याचे आढळून आले होते. याबद्दल वनकर्मचाऱ्यांनी उपवनसंरक्षक निनू सोमराज यांच्याकडे तोंडी तक्रार केली होती. याच प्रकारबद्दल 'लोकमत'ने वृत्त प्रकाशित करताच वनाधिकाऱ्यांचे धाबे दणाणले होते. वृत्ताची दखल घेत उपवनसंरक्षक सोमराज यांनी तत्काळ वनाधिकारी यांना प्रवेश बंदी लागू करण्याचे निर्देश दिले आहे. बंदी लागू झाल्यापासून जगंलात खासगी वाहनाची वर्दळ शून्यवर आली आहे. केवळ वनविभागाच्या वाहने जंगलात प्रवेश करीत आहे. जंगलात वर्दळ बंद झाल्यामुळे वन्यप्राण्याच्या वावरही वाढल्याचे काही वनकर्मचाऱ्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
ट्रॅप कॅमेऱ्यात बिबट कैद
जंगलात खासगी वाहनांची वर्दळ सुरु असल्यामुळे जंगलातील पाणवठ्यावर वन्यप्राण्यांचा वावर कमी झाल्याचे आढळून आले होते. मात्र, आता प्रवेश बंदी झाल्यामुळे जंगलातील पाणवठ्यांवर वन्यप्राण्यांचा वावर वाढला आहे. नुकताच एक बिबट भवानी तलावाच्या पाणवठ्यावर आढळून आल्याची माहिती वनविभागीय सूत्रांकडून मिळाली आहे.