बंदी आता ‘जेल टू कोर्ट’ थेट संवाद साधणार
By Admin | Updated: June 28, 2015 00:30 IST2015-06-28T00:30:11+5:302015-06-28T00:30:11+5:30
येथील मध्यवर्ती कारागृहाचे कामकाज ई-कोर्ट प्रणालीनुसार सुरु करण्यात येणार आहे.

बंदी आता ‘जेल टू कोर्ट’ थेट संवाद साधणार
कारागृहात ई-कोर्ट प्रणाली : बंद्यांचा डाटा मिळणार एका क्लिकवर
अमरावती : येथील मध्यवर्ती कारागृहाचे कामकाज ई-कोर्ट प्रणालीनुसार सुरु करण्यात येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार ‘जेल टू कोर्ट’ असा थेट संवाद बंद्यांचा असावा, याकरिता कारागृहात अत्याधुनिक प्रणालीची उपकरणे मागविण्यात आली आहेत. पहिल्या टप्प्यात बंद्यांची माहिती एका क्लिकवर उपलब्ध व्हावी, यासाठी डेटा तयार केला जात आहे.
कारागृहातून बंद्यांना न्यायालयात तारीख, सुनावणी अथवा खटल्याच्या प्रकरणात पाठवायचे असल्यास कारागृह प्रशासनाला पोलीस संरक्षणाशिवाय शक्य होत नाही. मात्र ई-कोर्ट प्रणालीने कारागृहातूनच बंद्यांशी न्यायाधीश संवाद साधतील, असे सॉफ्टवेअर विकसित करण्यात आले आहे. कारागृहांशी संबंधित माहिती या सॉफ्टवेअरमध्ये विकसित करण्यात आली आहे. नव्याने विकसित करण्यात आलेल्या ई-कोर्ट प्रणालीतून इंटरनेटच्या माध्यमातून ‘जेल टू कोर्ट’ असा संवाद साधणे सुकर होणार आहे. लॅपटॉपवरही न्यायालयातून बंद्यांशी संवाद साधून न्यायाधीश थेट साक्ष, पुरावे तपासताना विचारपूस करु शकतील, अशी व्यवस्था करण्यात आली आहे.
ई-कोर्ट प्रणालीमुळे वेळेची बचत होणार असून बंद्यांना ने- आण करताना लागणारा पोलीस बंदोबस्त, रस्त्यावरील धोका, नातेवाईकांची कोर्टात होणारी गर्दी हाताळण्यासाठी पोलिसांना करावी लागणारी कसरत थांबणार आहे. ई-कोर्ट प्रणालीच्या माध्यमातून न्यायाधीश थेट बंद्यांशी संपर्क साधतील. सध्या मध्यवर्ती कारागृहात तीन लॅपटॉपची व्यवस्था करण्यात आली आहे.
कारागृहात व्हिडीओ कॉन्फ्ररसिंगसाठी एलईडी बसविण्यात आला आहे. तसेच पेपरलेस कामकाजावरही कारागृह प्रशासनाचा भर सुरु आहे.
कारागृहात सुरु असलेले कॅन्टीन, कारखाना, आरागिरणी आदींची माहिती ही आॅनलाईन केली जाणार आहे. (प्रतिनिधी)
बंद्यांची आॅनलाईन माहिती मिळणार
कारागृहात आता बंद्यांची माहिती आॅनलाईन मिळणार आहे. बंदी कोणत्या गुन्ह्याखाली शिक्षा भोगत आहे, बंद्याचे छायाचित्र, नाव, पोलीस ठाणे, आईचे नाव, गुन्ह्याचे स्वरुप, वय, कारागृहात येण्याची तारीख, विवाहित अथवा अविवाहित अशी इत्थंभूत माहितीसह बंद्याचा डाटा तयार केला जात आहे. ही सर्व माहिती गोळा केली जात आहे. ही माहिती 'महाराष्ट्र प्रिझम' या वेबसाईटवर उपलब्ध होणार आहे.
हातांच्या ठशांवरही 'डेटा' तयार होतोय
कारागृहात येणाऱ्या बंद्यांची माहिती ई-कोर्ट प्रणालीअंतर्गत गोळा करणे बंधनकारक आहे. त्यानुसार कारागृहात येणाऱ्या प्रत्येक बंद्यांची माहिती हातांच्या ठशांवरही गोळा केली जाणार आहे. बंद्यांचे ‘फिंगर प्रिंट’ घेतले की क्षणात ती माहिती स्क्रिनवर उपलब्ध होईल, असे नवे सॉफ्टवेअर विकसित करण्यात आले आहे.
बंद्यांची नातेवाईकांशी भेट 'ईन-कॅमेरा'
कारागृह प्रशासनाच्या नियमानुसार विविध गुन्ह्यांखाली शिक्षा अथवा न्यायाधीन बंदी असलेल्यांना त्यांच्या नातेवाईकांशी भेट घेता येते. मात्र नवीन नियमानुसार बंद्यांची नातेवाईकांशी भेट ही ईन-कॅमेरा होईल. भेटावयास येणाऱ्या नातेवाईकांचे छायाचित्र, ओळखपत्र जमा केले जाईल. बंद्यांची भेट ईन कॅमेरा व्हावी, यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवून ते ब्रॉडब्रँडशी जोडले जाणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार ई-कोर्ट ही प्रणाली सुरु केली जात आहे. 'महाराष्ट्र प्रिझम' हे सॉफ्टवेअर कारागृहात व्यवस्थितरीत्या सुरु व्हावे, यासाठी विदर्भाचा समन्वयक म्हणून माझ्यावर जबाबदारी सोपविली आहे. या नवीन प्रणालीमुळे वेळेची बचत होऊन मुनष्यबळाची कमतरता भासणार नाही.
- नितीन क्षीरसागर,
वरिष्ठ तुरुंगाधिकारी, मध्यवर्ती कारागृह.
कारागृहात अशी आहे बंद्यांची संख्या
कारागृहात सध्या ११२७ कैदी जेरबंद आहेत. यात शिक्षा भोगणारे ५८५ पुरुष तर ३२ महिलांचा समावेश आहे. तसेच न्यायाधीन बंद्यांमध्ये ४९१ पुरुष तर १९ महिलांचा समावेश आहे. मोक्का किंवा नक्षलवादी कैदी येथे जेरबंद नाहीत. यापूर्वी कारागृहात अरुण गवळी यांच्यासह प्रसिद्ध खटल्यातील आरोपींना जेरबंद करण्यात आले आहे, हे विशेष.