बडनेरातील बालाजीनगर पाण्यात, रात्र काढली जागून, मोठे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:18 IST2021-09-08T04:18:15+5:302021-09-08T04:18:15+5:30
बडनेरा : रात्री बरसलेल्या जोरदार पावसाचे पाणी बालाजीनगरात शिरले. त्यामुळे अनेक घरांमध्ये पाणी होते. रहिवाशांनी रात्र जागून काढली. ...

बडनेरातील बालाजीनगर पाण्यात, रात्र काढली जागून, मोठे नुकसान
बडनेरा : रात्री बरसलेल्या जोरदार पावसाचे पाणी बालाजीनगरात शिरले. त्यामुळे अनेक घरांमध्ये पाणी होते. रहिवाशांनी रात्र जागून काढली. पहाटेपासूनच संबंधित यंत्रणा पाणी मोकळे करण्याच्या कामात लागली होती. नाल्याचे पाणी वस्तीसह शेतांमध्येदेखील शिरल्याने मोठे नुकसान झाले.
नव्या वस्तीच्या झिरी मंदिरापासून जवळच यवतमाळ महामार्गालगत बालाजीनगर परिसरात पावसाचे पाणी शिरल्याने एकच गोंधळ उडाला होता. परिसरातील बऱ्याच घरांमध्ये पाणी शिरले. त्यामुळे याभागातील लोकांना रात्र जागून काढावी लागली. परिसरातील लोकांच्या मते, एक्सप्रेस हायवेच्या उड्डाणपुलाखाली एका ठिकाणी नाला चोक झाल्यामुळे पावसाचे पाणी वस्तीकडे वळले. मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे नाला ओव्हर फ्लो झाल्याने त्याचेदेखील पाणी वस्तीत शिरल्याचे प्रशासनाचे म्हणणे होते. या नाल्याला कोंडेश्वराहून पाणी येते. साचलेल्या पाण्यामुळे सिमेंट, रेती, सेंट्रिंग, वाहने, घरातील महत्त्वाच्या वस्तू यांचे नुकसान झाले. नाल्यालगतच्या एका शेतातील जनावरांना रात्रभर पाण्यातच राहावे लागले. या परिसरात घरांचे बांधकाम सुरू आहे.
पहाटे रेस्क्यू पथकाद्वारे वस्तीतील पाणी काढण्याचे काम सुरू झाले. मनपाचे उपायुक्त, झोन अभियंता तसेच भाजप प्रदेश प्रवक्ता शिवराय कुळकर्णी, नगरसेवक प्रकाश बनसोड, नगरसेविका अर्चना धामणे, किशोर जाधव, राजू देवडा, बंडू धामणे, योगेश निमकर यांच्यासह परिसरातील नागरिक मदतीसाठी मोठ्या संख्येत जमले होते. दुपारी १२ पर्यंत नागरिकांना अडकून राहावे लागले. नेमके एवढ्या मोठ्या प्रमाणात वस्तीमध्ये पाणी का शिरले, याचे कारण प्रशासनाला शोधून काढावे लागेल. सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र, पुन्हा असे झाल्यास याला कोण जबाबदार राहील, असेही बोलले जात होते.
^^^^^^^^^^^^--^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
रेल्वे स्थानक परिसरात गुडघ्याएवढे पाणी
रात्रीच्या जोरदार पावसाचे पाणी बडनेरा रेल्वे स्थानकाच्या पार्किंग परिसरात साचले होते. त्याचप्रमाणे तिकीट बूकिंग कार्यालयासमोरदेखील पाणी साचले. रेल्वे पोलीस ठाणे तसेच सी.से. इंजिनीयर कार्यालय परिसरात पाणी साचले. साचलेल्या पाण्यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. जास्त पाऊस झाल्यास रेल्वे स्थानक परिसरात अशाच प्रकारे पाणी साचते. मात्र, संबंधित विभाग केवळ वरिष्ठांकडे पत्रव्यवहार करण्यापलीकडे ठोस पावले उचलत नसल्याचे एकंदर स्थितीवरून समोर आले आहे.