बजरंग दलाचे धाडसत्र, प्रेमीजनांची पळापळ!
By Admin | Updated: February 15, 2015 00:01 IST2015-02-15T00:01:49+5:302015-02-15T00:01:49+5:30
शहरात ‘व्हॅलेंटाईन डे’चा उत्साह ओसंडून वाहात होता. तरूणाईने आपापल्यापरिने प्रेमदिन अविस्मरणीय करण्याकरिता नियोजन केले होते.

बजरंग दलाचे धाडसत्र, प्रेमीजनांची पळापळ!
अमरावती : शहरात ‘व्हॅलेंटाईन डे’चा उत्साह ओसंडून वाहात होता. तरूणाईने आपापल्यापरिने प्रेमदिन अविस्मरणीय करण्याकरिता नियोजन केले होते. मात्र, शहरातील हॉटेल व रेस्टॉरेंट्समध्ये प्रेमालाप करणाऱ्या जोडप्यांना बजरंग दलाने हुसकावून लावल्याने प्रेमीयुगुलांमध्ये गोंधळ उडाला. बजरंग दलाच्या या आक्रमक भूमिकेमुळे ‘व्हॅलेंटाईन डे’ अविस्मरणीय करण्यास निघालेल्या जोडप्यांचा प्रचंड विरस झाला.
‘व्हॅलेंटाईन डे’वर संस्कृतीच्या अवहेलनेचा ठपका ठेवून या दिवसाचा सातत्याने विरोध करणाऱ्या विश्वहिंदू परिषद आणि बजरंग दलाने शहरातील तरूणाईच्या डोळ््यांत अंजन घालण्याच्या उद्देशाने शनिवार १४ फेब्रुवारी रोजी देशभक्त क्रांतिकारी भगतसिंग, राजगुरू, सुखदेव या शहिदांना इर्विन चौक येथील शहीद स्तंभावर मानवंदना अर्पण केली. शहिदांना सलाम केल्यानंतर हे संस्कृती रक्षक थेट शिवटेकडीवर पोहोचले. परंतु या ठिकाणी कोणताही गैरप्रकार नव्हता. केवळ दोन जोडपी याठिकाणी आढळून आल्यात. पश्चात या कार्यकर्त्यांनी त्यांचा मोर्चा गाडगेनगरातील एका प्रसिध्द कॉफी शॉपकडे वळविला. या कॉफी शॉपमध्ये एकांत शोधणाऱ्या जोडप्यांना हुसकावून लावले. त्यामुळे बेसावध तरूण-तरूणींची तारांबळ उडाली. मिळेल त्या वाटेने या जोडप्यांनी पळ काढला.
शहरात दरवर्षी विरोधाच्या सावटाखाली 'व्हॅलेंटाईन डे' साजरा होतो. विरोधाला न जुमानता तरूणाई चोरट्या मार्गाने एकांत शोधत फिरते. अनेक गैरप्रकारही होतात. अश्लील प्रकार आढळतात. त्यामुळेच बजरंग दल व विहिंपद्वारे आक्रमक भूमिका घेत असल्याचे सांगण्यात येते. कॉफी बारमध्ये गैरप्रकार सुरू असल्याची माहिती मिळाल्याने या ठिकाणी बजरंग दल व विहिंपचे कार्यकर्ते धडकले. या मोहिमेत निरंजन दुबे, रोहित कोठार, कुणाल देवासे, इंद्रकांत तिवारी, पवन श्रीवास, सत्यजित दुबे, विपिन गुप्ता, आकाश ठाकूर, शेखर सयाम, त्रीदेव डेंडवाल, विश्वजीत दुबे, श्रेयस चिम, अर्जुन दिघडे, विक्की ठाकूर, विक्की चावरे, अभिषेक सिंह, अमोल बॉक्सर, नितेश सिंह उपस्थित होते. (प्रतिनिधी)