बगाजी सागरची सुरक्षा रामभरोसे
By Admin | Updated: August 14, 2015 01:02 IST2015-08-14T01:02:26+5:302015-08-14T01:02:26+5:30
दोन जिल्ह्यांतील हजारो शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देऊन दोन शहरांची तहान भागविणाऱ्या बगाजी सागर धरणाची सुरक्षा मात्र रामभरोसेच आहे.

बगाजी सागरची सुरक्षा रामभरोसे
केवळ चार रक्षक : अपघात घडल्यास जबाबदार कोण ?
धामणगाव रेल्वे : दोन जिल्ह्यांतील हजारो शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देऊन दोन शहरांची तहान भागविणाऱ्या बगाजी सागर धरणाची सुरक्षा मात्र रामभरोसेच आहे. सद्यस्थितीत केवळ चार खासगी सुरक्षा रक्षक या साडेदहा किलोमीटर लांबीच्या धरणाचे रक्षण करीत असल्याचे चित्र आहे.
निम्म लोअर वर्धा प्रकल्पाची मुहूर्तमेढ १९७६ मध्ये रोवण्यात आली. बगाजी सागर धरणाच्या निर्मितीकरिता अमरावती जिल्ह्यातील २९ गावांना पुनर्वसित व्हावे लागले़ कोट्यवधी रूपयांची कसदार जमीन शेतकऱ्यांनी या धरणाकरिता त्याकाळी अल्प किमतीत शासनाला दिली. या धरणाचे पाणी अमरावती जिल्ह्यातील काही गावांना मिळते तर पुलगाव व देवळी या दोन्ही शहरांची तहान मुख्यत्वे या धरणातून भागविली जाते. देवळी तालुक्याकरिता तर हे धरण वरदान ठरले आहे़ सिंचनासाठी वर्षभर पाणी देण्याची क्षमता या धरणात आहे़
धरणाची २५३ मिलियन मीटर जलक्षमता असून जिल्ह्याच्या शेवटच्या टोकापासून वर्धा जिल्ह्याच्या पूर्व टोकला १० किलोमीटर अंतराची भिंत उभारण्यात आली आहे़ धरणाचे ३१ दरवाजे उघडल्यानंतर पर्यटकांची गर्दी वाढते़ मात्र, सुरक्षेचे उपाय अपूर्ण आहेत.