बगाजी सागर, सपन धरणाचे दरवाजे उघडले
By Admin | Updated: August 5, 2015 00:30 IST2015-08-05T00:30:13+5:302015-08-05T00:30:13+5:30
मागील ४८ तासापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे बगाजी सागर धरणाचे पाच दरवाजे उघडले असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे़

बगाजी सागर, सपन धरणाचे दरवाजे उघडले
प्रकल्प 'ओव्हरफ्लो' : नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
धामणगाव रेल्वे/ अचलपूर : मागील ४८ तासापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे बगाजी सागर धरणाचे पाच दरवाजे उघडले असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे़
निम्म लोअर वर्धा अंतर्गत बगाजी सागर ३१ दरवाजे असलेल्या या धरणाची २५३़१७ दशलक्ष घनमीटर पाणीसाठवक्षमता आहे़ सध्या या धरणात ७३़७ दलघमी साठा आहे़ मागील २४ तासांत या धरणक्षेत्रात ४५ मि.मी. पाऊस कोसळल्याने या धरणाच्या पाणी पातळीत २८ सेंटीमिटरने वाढ झाली आहे़ सोमवारी रात्रीपासून या धरणाचे एंकदरीत पाच गेट उघडण्यात आले आहे़ ३३ क्युरेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे़ आगामी २४ तासात या भागात संततधार पाऊस पडला आणि पाण्याची पातळी अधिक वाढली तर कोणत्याही क्षणी अधिक धरणाचे दरवाजे उघडण्यात येईल, असे निम्म लोअर वर्धा प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता व्ही़व्ही गावंडे यांनी सांगितले़ तालुक्यातील १२ गावे वर्धा नदी काठी असल्याने या गावातील ग्रामस्थांनी सतर्कता बाळगावी यासाठी कोतवाला मार्फत दवंडी देण्यात आली आहे. (तालुका प्रतिनिधी)
सपन प्रकल्पाची चार दारे उघडली
अचलपूर तालुक्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे मंगळवारी सपन या लघु प्रकल्पाचे चार दरवाजे उघडले असल्याचे प्रकल्पाचे अधिकारी रघुवंशी यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले. प्रकल्पाचे मनोहारी दृश्य पाहण्यासाठी दुपारी शहर व तालुक्यातील नागरिकांनी प्रकल्पस्थळी गर्दी केली होती.