बडनेरा पोलीस ठाण्यात १९ वाहने बेवारस पडून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:21 IST2021-05-05T04:21:42+5:302021-05-05T04:21:42+5:30
बडनेरा : स्थानिक पोलीस ठाण्याच्या आवारात काही वर्षांपासून मालकांचा थांगपत्ता नसल्याने पडून असलेल्या १९ वाहनांचा लिलाव करण्यात येणार असल्याची ...

बडनेरा पोलीस ठाण्यात १९ वाहने बेवारस पडून
बडनेरा : स्थानिक पोलीस ठाण्याच्या आवारात काही वर्षांपासून मालकांचा थांगपत्ता नसल्याने पडून असलेल्या १९ वाहनांचा लिलाव करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यापूर्वी वाहन हरविलेल्या व्यक्तींनी कागदपत्रांसह आपल्या वाहनाची शहानिशा करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
बडनेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सापडलेली १७ दुचाकी व दोन चारचाकी वाहने गेल्या काही वर्षांपासून आवारात पडून आहेत. नियमानुसार या वाहनांचा लिलाव करावा लागतो. ज्यांची वाहने मिळाली नाहीत, अशा वाहनमालकाने कागदपत्रांसह बडनेरा पोलीस ठाण्यात शहानिशा करण्यासाठी प्रत्यक्ष यावे किंवा संपर्क करावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक पंजाब वंजारी यांनी केले आहे. वाहन सुपुर्द करण्याची प्रक्रिया न्यायालयीन नियमानुसारच होणार आहे.
०००००००००००००००००००००००
मिलचाळ परिसरात पाणीपुरवठा सुरळीत न केल्यास आंदोलन
बडनेरा : येथील नव्या वस्तीच्या मिलचाळ परिसरातील काही भागांत जीवन प्राधिकरणकडून पाण्याचा पुरवठा सुरळीत होत नसल्याने नागरिक त्रस्त आहेत. युवा स्वाभिमानने आंदोलनाचा इशारा दिला आहे.
बऱ्याच महिन्यांपासून मिलचाळ परिसरातील काही भागांत पाण्याचा पुरवठा सुरळीत होत नसल्याने तेथील नागरिकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया आहेत. आमच्या भागात तात्काळ पाणीपुरवठा सुरळीत करा; अन्यथा आंदोलन छेडू, असा इशारा युवा स्वाभिमानचे सिद्धार्थ बनसोड व परिसरातील नागरिकांनी एका निवेदनातून जीवन प्राधिकरणला दिला आहे. बडनेरा शहरात पाणीपुरवठा सुरळीत न होणे, गळती, गढूळ पाणी येणे या समस्या दिवसेंदिवस शहरवासीयांची डोकेदुखी वाढवीत आहेत.