परतवाडा वनपालपद परत एकदा चर्चेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:32 IST2021-01-13T04:32:33+5:302021-01-13T04:32:33+5:30
अनिल कडू परतवाडा : अमरावती वनविभाग अंतर्गत परतवाडा वनपालपद परत एकदा चर्चेत आले आहे. कार्यरत वनपालाच्या पदोन्नतीसंदर्भात आधीच इच्छुकांनी ...

परतवाडा वनपालपद परत एकदा चर्चेत
अनिल कडू
परतवाडा : अमरावती वनविभाग अंतर्गत परतवाडा वनपालपद परत एकदा चर्चेत आले आहे. कार्यरत वनपालाच्या पदोन्नतीसंदर्भात आधीच इच्छुकांनी आपली फिल्डिंग लावायला सुरुवात केली आहे. यात जुण्या आणि नव्यांचा समावेश आहे.
परतवाडा वनपालपदी कार्यरत विद्यमान वनपाल जून २०१९ मध्ये दीड वर्षांपूर्वी रुजू झाले आहेत. दरम्यान, त्यांचे नाव डिसेंबर २०२० मध्ये पदोन्नतीच्या यादीत आले आणि त्यांची आरएफओपदी वर्णी लागणार असल्याच्या वार्तेने वनविभागात जाेर पकडला. यात पदोन्नतीसह नवा आदेश मिळण्याआधीच परतवाडा वनपालपदी आस लावून बसलेले, या पदाकरिता टपून असलेले नवे, जुने सर्वच स्पर्धेत उतरले.
अमरावती वनविभागांतर्गत जून २०१९ मध्ये वनपालाच्या बदल्या पार पडल्या. यात २७ वनपाल स्पर्धेत होते. या सर्वांनी परतवाडा वनपालपदी वर्णी लागावी म्हणून यथाशक्ती प्रयत्न केले होते. पण, यात चमत्कार घडला आणि स्पर्धेतील सर्वच बाद झाले. एकाच्या पदरी तर कमालीची निराशा आली होती.
अमरावती वनविभागांतर्गत परतवाडा वनपालपद महत्त्वाचे मानले जाते. परतवाडा वनपालपदी आपलीच वर्णी लागावी म्हणून स्थानिकांसह अन्य ठिकाणांवरील वनपाल बदली प्रक्रियेदरम्यान नेहमीच प्रयत्नात असतात. याकरिता स्थानिक अधिकाऱ्यांच्या मनधरणीपासून तर मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) कार्यालयातील संबंधित यंत्रणेकडे फिल्डिंग लावण्यात कुणीही कुठलीही कसर ठेवत नाही. वनपरिक्षेत्र अधिकारीही यात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करतात.
पदोन्नतीआधीच रंगत असलेली स्पर्धा, लावल्या जात असलेली फिल्डिंग या बाबी परतवाडा वनपालपदाच्या अनुषंगाने सध्या वनविभागात चर्चेत आल्या आहेत. एकाने तर हे पद पटकावण्यासाठी स्थानिक वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांकडून शिफारसही मिळविल्याचे सांगितल्या जात आहे. हे शिफारस मिळविणारे जून २०१९ मधील वनपालांच्या बदल्यांदरम्यान चांगलेच चर्चेत होते. त्यांचे मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) अमरावती व अप्पर प्रधान मुख्यवनसंरक्षक तथा क्षेत्रसंचालक, मेळघाट व्याघ्र क्षेत्रसंचालक, अमरावती यांच्याकडील दरबारात बऱ्यापैकी वजन असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, काही स्पर्धक ‘थांबा, वाट पाहा’च्या भूमिकेत असून, पदोन्नतीनंतर चर्चेतील जुन्यांची वर्णी लागले की नव्याला संधी मिळते, याकडे वनविभागातील वनपालांसह वनरक्षकांचे लक्ष लागले आहे.