परतवाडा वनपाल, वनरक्षकांना गावठी बॉम्बचे सान्निध्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:14 IST2021-01-03T04:14:53+5:302021-01-03T04:14:53+5:30
पान तीन लिड फोटो - पी/०२/अनिल कडू फोल्डर कॅप्शन - याच लाकडी खोलीत बॉम्ब ठेवले आहेत. परतवाडा : अनेक ...

परतवाडा वनपाल, वनरक्षकांना गावठी बॉम्बचे सान्निध्य
पान तीन लिड
फोटो - पी/०२/अनिल कडू फोल्डर
कॅप्शन - याच लाकडी खोलीत बॉम्ब ठेवले आहेत.
परतवाडा : अनेक स्फोटक गावठी बॉम्बच्या सान्निध्यात परतवाडा येथील वनपाल व वनरक्षक एक वर्षापासून कार्यरत आहेत. या गावठी बॉम्बचा स्फोट होऊन वनविभागाच्या दस्तावेजासह वनकर्मचारी व अधिकाऱ्यांना इजा पोहचण्याची शक्यता दरवेळी असते. हे गावठी बॉम्ब निष्क्रिय करण्यासाठी बॉम्ब शोधक व नाशक पथकाची प्रतीक्षा होत आहे.
रानडुकराच्या शिकार प्रकरणात आरोपींना अटक केल्यानंतर परतवाडा वनअधिकाऱ्यांनी ९ डिसेंबर २०१९ ला आरोपींकडून २३ गावठी बॉम्ब जप्त केले. ते नष्ट करण्याची अनुमती वनअधिकाऱ्यांनी अचलपूर न्यायालयाला मागितली. मात्र, ती नाकारण्यात आली. अचलपूर न्यायालयाने १८ डिसेंबर २०१९ ला दिलेल्या आदेशावरून परतवाडा वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी १६ जानेवारी २०२० ला हे २३ गावठी बॉम्ब उपमुख्य विस्फोटक नियंत्रक (नागपूर) यांच्याकडे पाठवले. पण, नियंत्रकांनी १७ जानेवारी २० च्या पत्रान्वये ते गावठी बॉम्ब परतवाड्याला परतविले आणि अमरावती स्थित बॉम्ब शोधक व नाशक पथकाकडे पाठविण्याचे निर्देश दिले.
वनअधिकाऱ्यांनी या निर्देशानंतर बॉम्ब शोधक व नाशक पथकाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, कोरोनामुळे हा विषय प्रलंबित राहिला. यादरम्यान १५ डिसेंबरच्या पत्रान्वये अचलपूर न्यायालयाचा आदेश, उपमुख्य विस्फोटक नियंत्रक (नागपूर) यांच्या पत्रासह आवश्यक माहिती बॉम्ब शोधक व नाशक पथकाच्या पोलीस निरीक्षकांनी वनअधिकाऱ्यांकडून मागवली आहे.
परतवाड्यात ७३ गावठी बॉम्ब
परतवाडा वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयात ७३ गावठी बॉम्ब आहेत. यातील २३ गावठी बॉम्ब जंगली डुकराच्या शिकार प्रकरणात ९ डिसेंबर २०१९ ला जप्त केले, तर उर्वरित ५० गावठी बॉम्ब खैरी शिवारातून ट्रॅपमध्ये अडकलेल्या बिबट्याला २५ एप्रिलला जेरबंद केल्यानंतर संशयित आरोपींकडून वनअधिकाऱ्यांनी जप्त केले. हे ७३ गावठी बॉम्ब जुन्या कार्यालयालगत प्रवेशद्वारावर असलेल्या तुटक्या, पडक्या लाकडी खोलीत टाकाऊ वस्तूसोबत ठेवण्यात आले आहेत.
कस्टडी नाही
गावठी बॉम्ब ठेवण्याकरिता वनअधिकाऱ्यांकडे सुरक्षित कस्टडीच नाही. या पडक्या, तुटक्या लाकडी खोलीलगतच वनपाल आणि वनरक्षक बसतात. तेथेच वनविभागाचा आवश्यक दस्तावेज आहे. ज्या खोलीत हे गावठी बॉम्ब आहेत, त्या खोलीत उंदरांचे, घुशींचे साम्राज्य आहे. या गावठी बॉम्बला उंदरांनी किंवा घुशींनी किंवा अन्य सरपटणाऱ्या प्राण्यांनी कुरतळल्यास, चावल्यास त्याचा स्फोट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
आसेगाव पोलीस
सावळापूर फाट्यावर या अशाच गावठी बॉम्बच्या स्फोटात ९ नोव्हेंबरला खैरी येथील एक इसम ठार झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाला. आजही तो बरा होण्यापलीकडे आहे. या घटनेनंतर गावठी बॉम्बविषयी आणि आरोपींविषयी अधिक माहिती घेण्याकरिता आसेगाव पोलीस परतवाडा वनपरिक्षेत्र कार्यालयात अलीकडेच येऊन गेले. गावठी बॉम्बच्या अनुषंगाने आसेगाव पोलिसांकडूनही चौकशी सुरू आहे.
कोट
२३ गावठी बॉम्बबाबत बॉम्ब शोधक व नाशक पथकाने माहिती मागवली आहे. लवकरच हे गावठी बॉम्ब नष्ट केले जाणार आहेत.
- प्रदीप भड, आरएफओ, परतवाडा.