आश्वासनात आघाडी अंमलबजावणीत पिछाडी
By Admin | Updated: February 11, 2015 00:20 IST2015-02-11T00:20:16+5:302015-02-11T00:20:16+5:30
जिल्ह्यातील १ हजार ९१८ गावांमधील अंतिम पीक पैसेवारी ५० पैशापेक्षा कमी भरली आहे. टंचाईग्रस्त गावांमध्ये शासनाने आठ उपाययोजना लागू केल्या आहेत.

आश्वासनात आघाडी अंमलबजावणीत पिछाडी
अमरावती : जिल्ह्यातील १ हजार ९१८ गावांमधील अंतिम पीक पैसेवारी ५० पैशापेक्षा कमी भरली आहे. टंचाईग्रस्त गावांमध्ये शासनाने आठ उपाययोजना लागू केल्या आहेत. मात्र अंमलबजावणीच्या संदर्भात प्रशासकीय यंत्रणा धीम्या गतीने काम करीत आहे अशी स्थिती आहे.
पीक नुकसानापोटी आतापर्यंत १२५ कोटीचे वितरण करुन आणखी कोट्यवधीच्या वाटपाला मंजुरी देऊन शासनाने तरतूद केली आहे. मागील १०० दिवसात मदत आणि पुनर्वसन विभागाला निर्णय घेण्यातील आघाडी अंमलबजावणी बाबत मात्र पाळता आलेली नाही. विभागात शेतकऱ्यांच्या आत्महत्या अद्यापही सुरूच आहेत. हीच सर्वाधिक चिंतेची बाब आहे. विदर्भात अमरावती विभाग, मराठवाडा, उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात यंदा दुष्काळाची तीव्रता मोठी आहे. अपुऱ्या पर्जन्यमानामुळे खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामासह फळबागाही बाधित झाल्या आहेत. शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. फळबागायतदार शेतकऱ्यांचेही मोठे नुकसान झाले आहेत. येत्या काळात नुकसानीची तीव्रता आणखी वाढणार आहे. पिण्याचे पाणी, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर झाला आहे. मुख्यमंत्र्यांनी दोनदा डेडलाईन देऊनही शेतकरी अद्याप मदतीपासून वंचित आहेत. जिल्ह्यातील १९८१ गावांमध्ये ५० पैशांपेक्षा कमी पैसेवारी दिसून आली होती.