बच्चू कडू यांचा मुख्यमंत्र्यांना 'लेटरबॉम्ब'; 'या' ८ मुद्द्यांवर बैठक घेण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2022 12:09 PM2022-08-26T12:09:25+5:302022-08-26T12:12:14+5:30

केरळच्या धर्तीवर अराजपत्रित पदभरती करा, ७२०० पोलीस भरतीची जाहिरात काढा, बच्चू कडूंची मागणी

Bachu Kadu's letter to CM Eknath Shinde; Demand for meeting on eight issues related to students, disabled, various examinations | बच्चू कडू यांचा मुख्यमंत्र्यांना 'लेटरबॉम्ब'; 'या' ८ मुद्द्यांवर बैठक घेण्याची मागणी

बच्चू कडू यांचा मुख्यमंत्र्यांना 'लेटरबॉम्ब'; 'या' ८ मुद्द्यांवर बैठक घेण्याची मागणी

Next

अमरावती : केरळ राज्याच्या धर्तीवर एमपीएससीच्या कक्षाबाहेरील वर्ग २ अराजपत्रित आणि वर्ग ३, ४ ची पदे एमपीएससीच्या माध्यमातून भरण्यात यावी. सन २०१८ मध्ये एमपीएससी मुख्यालय बांधकामाबाबत निर्णय झालेला आहे. तथापि, काही तांत्रिक अडचणीमुळे रखडलेली प्रक्रिया पूर्ण करून मुख्यालयाच्या बांधकामाची प्रक्रिया सुरू करावी. एमपीएससीचे रिक्त दोन सदस्य भरण्यात यावे, या आशयाचे पत्र गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना माजी राज्यमंत्री तथा आमदार बच्चू कडू यांनी दिले.

आमदार कडू यांनी गत आठवड्यात अधिवेशनात शेतकरी, शेतमजूर, कामगार, कष्टकऱ्यांच्या हिताचे प्रश्न, समस्या मांडताना तडाखेबाज भाषण केले. आमदार बच्चू कडू हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे समर्थक आहेत. मात्र, त्यांनी सामान्य माणसाच्या प्रश्नांना प्राधान्य देत सरकारची विकेट घेण्याचा प्रयत्न केला, हे विशेष.

आमदार कडू यांचा सभागृहातील ‘प्रहार’ शमत नाही तोच गुरुवारी त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना ८ विषयांवर मागण्यांसाठी पत्र दिले आहे. एवढेच नव्हे तर यासंदर्भात बैठकीबाबत अवगत केले आहे. त्यामुळे आमदार बच्चू कडू हे सरकारमध्ये असो वा विरोधात ‘अपना भिडू, बच्चू कडू’ या म्हणीनुसार सामान्य व्यक्तीची बाजू मांडण्यासाठी ते कोणतीही संधी सोडत नाहीत.

मुख्यमंत्र्यांच्या पत्रात हे आहेत आठ मुद्दे

  • केरळ राज्याच्या धर्तीवर एमपीएससीच्या कक्षाबाहेरील वर्ग २ अराजपत्रित आणि वर्ग ३, ४ ची पदे एमपीएससीच्या माध्यमातून भरण्यात यावी.
  • राज्य शासनाने ७२०० पोलीस भरतीची घोषणा केली, आता जाहिरात प्रसिद्ध करावी.
  • जिल्हा परिषद, एमआयडीसी, पशुसंवर्धन, सार्वजनिक आरोग्य सेवकांची २०१९ ची रखडलेली पदभरती करावी.
  • भूमी अभिलेख विभागाच्या गट क पदांच्या १०१३ जागांच्या परीक्षा तत्काळ घ्याव्यात.
  • सहायक आयुक्त (अन्न), अन्न सुरक्षा अधिकारी गट ब संदर्भात एमपीएससी परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध करावी.
  • कोरोना काळात एक वेळची विशेष बाब म्हणून परीक्षांचा कालावधी वाढवून देण्याविषयी शासनादेश निर्गमित करावा.
  • दिव्यांग व्यक्ती हक्क कायदा २०१६ नुसार सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये दिव्यांगांचा विचार करावा.
  • महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा २०१९ मधील पात्र ११४५ उमेदवारांची चारित्र पडताळणी, वैद्यकीय तपासणी अधीन नेमणुका देण्यात याव्यात.

 

आमदार, मंत्रिपद हे लोकसेवेसाठी आहे. ते काही मिरवण्याचे साधन नाही. त्यामुळे लोकांचे प्रश्न, समस्या सोडविण्यासाठी मी समाजसेवा त्यानंतर राजकारणात आलो आहे. पद असो किंवा नसो. माझा पिंड हा लोकांना न्याय देण्याची भूमिका आहे आणि ते शेवटपर्यंत मांडणारच. त्यामुळेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र देऊन बैठक घेण्याचे कळविले आहे.

- बच्चू कडू, आमदार

Web Title: Bachu Kadu's letter to CM Eknath Shinde; Demand for meeting on eight issues related to students, disabled, various examinations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.