लोकमत न्यूज नेटवर्क परतवाडा : आपल्या कार्यकाळात सुरू झालेल्या विविध विकासकामांमध्ये रखडलेल्या कामासंदर्भात माजी आमदार बच्चू कडू यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची नागपूर येथे भेट घेतली. यावेळी अचलपूर येथील फिनले मिल, परतवाडा- अमरावती महामार्ग, पुलांचे नूतनीकरण, बहिरम- बैतूल मार्ग तसेच इतरही विविध रखडलेल्या विकास कामांवर चर्चा झाली. तत्काळ कामे केली जाणार असल्याचे आश्वासन यावेळी ना. गडकरी यांच्याकडून देण्यात आले.
अचलपूर विधानसभा मतदारसंघात कोट्यवधीची विकासकामे माजी आमदार बच्चू कडू यांच्या कार्यकाळात मंजूर झाली. काही कामे अपूर्ण असल्याने त्या संदर्भात माजी आमदार बच्चू कडू यांनी नागपूर येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन संबंधित कामे पूर्ण करण्यासंदर्भात चर्चा वजा विनंती केली. यासोबतच इतरही विषयांच्या अनुषंगाने बच्चू कडू यांनी संवाद साधाला. यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरीं यांनीसुद्धा या संपूर्ण कामांची माहिती घेत लवकरच ती मार्गी लावणार असल्याचे कडू यांना सांगितले.
परतवाडा-अमरावती मार्ग, पुलांचे काम परतवाडा-अमरावती मार्ग विविध अडथळ्यांनी आतापर्यंत रखडला. हा प्रकल्प पूर्ण करण्याची विनंती त्यांनी ना. गडकरी यांना केली त्यासोबतच परतवाडा ते चांदूर बाजार चौपदरीकरण मार्गावरील कुरळ पूर्ण व तळेगाव मोहना येथील पुलाचे काम तसेच बहिरम-बैतूल मार्गावरील अर्धवट राहिलेला मार्ग प्राधान्याने पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली.
फिनले मिल, चांदूरबाजार बायपास अचलपूर येथील फिनले मिल बंद पडल्याने शेकडो कामगारांवर बेरोजगारीची कुहाड कोसळली. नफ्यात असलेल्या या मिलला पुनरुज्जीवन देण्यासोबत रोजगाराचा रखडलेला मार्ग सुरू करण्याची मागणी करण्यात आली. चांदूरबाजार- परतवाडा शहरासाठी असलेल्या बायपासलासुद्धा तत्काळ प्राधान्य देण्याची मागणी करण्यात आली.
शकुंतला रेल्वे सुरू करा शकुंतला रेल्वे इतिहासजमा होण्यापूर्वी तिचे पुनरुज्जीवन करून ती सुरू करण्याची मागणीसुद्धा बच्चू कडू यांनी यावेळी केली. विकासकामात राजकारण नव्हे, तर कार्यकाळातील राहिलेले अनेक विषय पूर्ण करण्याची धावपळ कायम असल्याचे स्पष्ट करीत त्यांनी ना. गडकरी यांच्याकडे चांदूरबाजार, अचलपूर तालुक्यातील समस्या मांडल्या.