लोकसहभागातून बाबासाहेबांचे स्मारक
By Admin | Updated: April 3, 2016 03:49 IST2016-04-03T03:49:20+5:302016-04-03T03:49:20+5:30
इर्विन चौकात डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा सौंदर्यीकरण व संवर्धन समितीच्या वतीने उभारण्यात येणारे ...

लोकसहभागातून बाबासाहेबांचे स्मारक
पालकमंत्री : जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक
अमरावती : इर्विन चौकात डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा सौंदर्यीकरण व संवर्धन समितीच्या वतीने उभारण्यात येणारे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे भव्य स्मारक व सौंदर्यीकरणाचे काम लोकसहभागातून पूर्ण करू, असे प्रतिपादन पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात शनिवारी आयोजित बैठकीत ते बोलत होते.
खासदार आनंदराव अडसूळ, आमदार सुनील देशमुख, राजेंद्र गवई, प्रदीप दंदे, राजेश वानखेडे, किशोर बोरकर, निवासी जिल्हाधिकारी मोहन पातुरकर, प्रकाश बनसोड आदी उपस्थित होते. पालकमंत्री पोटे म्हणाले, डॉ.बाबासाहेबांची १२५ वी जयंती देशभरात साजरी करतोय. इंदू मिलचा प्रश्न तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे लंडन येथील घर आदी जिव्हाळ्याची, महत्त्वपूर्ण कामे झाली आहेत. स्मारकासाठी लागणाऱ्या जमिन भूसंपादनाच्या कार्यवाहीला गती द्यावी. स्मारक उभारणीच्या कामात महापालिकेची महत्त्वाची भूमिका आहे. डॉ.बाबासाहेब हे देश व जागतिक पातळीवरचे व्यक्तिमत्त्व असल्यामुळे त्याला साजेशे स्मारक लोकसहभागातून उभे करू. स्मारकासाठी ६ हजार चौरस फूट जागा लागणार आहे. मनपाचे सर्व नगरसेवक प्रत्येकी ५ लाख रुपये या कामासाठी देणार आहेत. शिवाय महापालिका तसेच जिल्हा नियोजन समिती व लोकसहभागाच्या माध्यमातून भव्य स्मारक उभारू, असेही ते म्हणाले.