निबंधक कार्यालय मूळ जागेत नेण्यास टाळाटाळ
By Admin | Updated: November 16, 2014 22:43 IST2014-11-16T22:43:36+5:302014-11-16T22:43:36+5:30
तहसील कार्यालय परिसरातील मूळ जागेत असलेले सहदुय्यम निबंधक कार्यालय सौंदर्यीकरणाच्या नावाखाली तीन वर्षांपूर्वी परतवाडा मार्गावरील भाड्याच्या इमारतीत स्थानांतरित केल्याने

निबंधक कार्यालय मूळ जागेत नेण्यास टाळाटाळ
अचलपूर : तहसील कार्यालय परिसरातील मूळ जागेत असलेले सहदुय्यम निबंधक कार्यालय सौंदर्यीकरणाच्या नावाखाली तीन वर्षांपूर्वी परतवाडा मार्गावरील भाड्याच्या इमारतीत स्थानांतरित केल्याने जनता त्रस्त झाली आहे. भाड्याचा करार संपून दीड महिना झाल्यावरही कार्यालय तेथेच आहे. कार्यालय पूर्वीच्या जागेत हलविण्यासाठी दुय्यम निबंधक अधिकारी चालढकल करीत असल्याचे दिसते.
सहदुय्यम निबंधक कार्यालय स्थापन झाल्यापासून तहसील कार्यालय परिसरात होते. त्यामुळे ग्रामीण भागातून स्थावर मालमत्तेची खरेदी-विक्री करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांचे काम सहज होत असे. मुद्रांक विक्रेते व लेखनिकांचे कार्यालयही तेथेच असल्याने सोय होती. परंतु हे कार्यालय तीन वर्षांपासून अचलपूर-परतवाडा मार्गावरील भाड्याच्या इमारतीतील स्थानांतरीत करण्यात आले. अचलपूर नगरपरिषद क्षेत्रातील नझूल शीट नंबर २३ प्लाट क्रमांक ८ मधील तुकडा नंबर १८ मध्ये आहे. याचे क्षेत्रफळ १ हजार चौरस फूट आहे.
सुलभा रामकृष्ण वानखडे यांच्या मालकीची ही इमारत आहे. १ ंआॅक्टोबर २०११ पासून ते ३० सप्टेंबर २०१४ पर्यंत तीन वर्षांकरिता हे कार्यालय भाडे करारावर घेण्यात आले होते. त्यावेळी हे कार्यालय तहसील कार्यालयातून स्थानांतरित करण्यासाठी आरपीआयचे (आठवले) तालुकाध्यक्ष विलास थोरात, गोविंद चरपटे, माजी सरपंच दिलीप राऊत, श्रीकांत तळोकार, फिरोजखान आदींनी विरोध केला होता. त्याविरोधात लेखी निवेदनही दिले होते. हा विरोध डावलून हे कार्यालय भाड्याच्या इमारतीत हलविण्यात आले होते. एका मुद्रांक विक्रेत्याच्या आग्रहाखातर या कार्यालयाचे स्थानांतरण करण्यात आल्याची चर्चा त्यावेळी होती.
आधीच दलालांच्या विळख्यात असलेले कार्यालय तहसील कार्यालय परिसरातून भाड्याच्या इमारतीत गेल्यावर दलालांचा राबता वाढला. परिणामी आतापर्यंत कधीही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात न अडकलेले तीन महिन्यांपूर्वी अलगद सापडले. आठ दिवस येथील भ्रष्टाचार थांबला. परंतु गेल्या काही दिवसांपासून या कार्यालयात पुन्हा दलालांची राबता वाढला आहे. हे कार्यालय मूळ जागेत स्थानांतरित करण्यास टाळाटाळ केली जात असल्याचे स्पष्ट चित्र आहे. भाडेकरार संपल्याने आता हे कार्यालय पुन्हा जुन्या जागी हलवावे, अशी मागणी केली जात आहे. (शहर प्रतिनिधी)