ग्रा.पं.ची आमसभा घेण्यास टाळाटाळ
By Admin | Updated: March 23, 2015 00:32 IST2015-03-23T00:32:55+5:302015-03-23T00:32:55+5:30
सावलीखेडा ग्रामपंचायतीची मासिक सभा सरपंच-सचिवांनी सहा महिन्यांपासून घेतली नाही.

ग्रा.पं.ची आमसभा घेण्यास टाळाटाळ
धारणी: सावलीखेडा ग्रामपंचायतीची मासिक सभा सरपंच-सचिवांनी सहा महिन्यांपासून घेतली नाही. त्यामुळे विकासकामे खोळंबली असून मुंबई ग्रा. पं. अधिनियम १९५८ प्रमाणे सरपंचाचे पद रद्द करून सचिवांना निलंबित करण्याची लेखी तक्रार उपसरपंचासह ग्रा. पं. सदस्यांनी जि. प. मुख्य कार्यपालन अधिकारी यांच्यासह बीडीओंकडे केली आहे.
तालुक्यातील ग्रा. पं. सावलीखेडाची मासिक सभा नियमानुसार दर महिन्यात घेणे बंधनकारक आहे. त्यात गावातील विकासात्मक कामांचा आढावा, योजनांची माहिती देणे गरजेचे आहे. मात्र आॅक्टोबर २०१४ ते मार्च २०१५ पर्यंत सावलीखेडा ग्रा. पं. सचिव/सरपंचाने मासिक सभाच न घेतल्यामुळे गावातील पूर्ण विकासकामे ठप्प झाली आहेत. सचिव हा मुख्यालयी सतत गैरहजर राहत असल्यामुळे विकासकामांचा निधी मार्चमध्ये खर्च झाला नाही. तसेच मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ प्रमाणे कलम नं. ३६ नुसार मासिक सभेची नोटीस तीन दिवसांआधी देणे गरजेचे आहे. मात्र तरीही सहा महिन्यांपासून सचिवांनी मासिक सभा घेतली नाही.
यासंदर्भात ग्रामपंचायत उपसरपंचा विमला रोकडे, सदस्य किशोर मावस्कर, द्रोपती धांडे, रिचुबाई दारसींबे, गंगाराम मावस्कर इत्यादींनी संबंधित सचिवावर ग्रा. पं. मुंबई अधिनियमांतर्गत निलंबनाची कारवाई करून सरपंचाचे पदही रद्द करावे, अशी तक्रार बीडीओ धारणीसह जि. प. मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांकडे पाठविली आहे.
ग्रामपंचायतीची मासिक सभा गेल्या सहा महिन्यांपासून झाली नसल्याने सावलीखेड्याच्या विकासाचे अनेक मुद्दे प्रलंबित आहेत. सरपंच व सचिवांच्या अनास्थेमुले विकासाचे मुद्देच मार्गी लागत नसल्याने सावलीखेडावासी हैराण झाले आहेत. सरपंच-सचिवांची चौकशी करून ग्रामपंचायतीची आमसभा न घेण्याच्या कारणांचे विश्लेषण करावे, अशी मागणी ग्रामस्थांकडूून केली जात आहे. यात दोघेही दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. (शहर प्रतिनिधी)