अतिक्रमित बांधकाम काढण्यास टाळाटाळ

By Admin | Updated: February 2, 2016 00:13 IST2016-02-02T00:13:30+5:302016-02-02T00:13:30+5:30

अचलपूरच्या वाढत्या अतिक्रमणाकडे नगरपालिकेचे पदाधिकारी हेतुपुरस्सर दुर्र्लक्ष करीत आहेत.

Avoid to remove encroachment construction | अतिक्रमित बांधकाम काढण्यास टाळाटाळ

अतिक्रमित बांधकाम काढण्यास टाळाटाळ

पालिकेचे दुर्लक्ष : तक्रारदार त्रस्त, रस्ता गायब, कारवाई केव्हा?
सुनील देशपांडे अचलपूर
अचलपूरच्या वाढत्या अतिक्रमणाकडे नगरपालिकेचे पदाधिकारी हेतुपुरस्सर दुर्र्लक्ष करीत आहेत. कागदोपत्री अतिक्रमित जागेवरील बांधकाम हटविण्याचे आदेश देतात. मात्र प्रत्यक्ष कारवाई करीत नाही. त्यामुळे जनता त्रस्त झाली आहे.
अचलपूर शहरच अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले आहे. ज्याला जसे वाटेल तेथे तो एखाद्या नगरसेवकाच्या आशीर्वादाने किंवा संबंधित अधिकाऱ्यांना चिरीमिरी देऊन नझूलच्या जागेवर बांधकाम करतो. त्यातून नगर परिषदेने आरक्षित केलेले भूखंड रस्तेही सुटलेले नाहीत. एका भूखंडाच्या अतिक्रमणाचा बाद थेट गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांच्या दालनात गेल्यावरही ते बांधकाम पाडले नाही. दुसऱ्या ठिकाणी सार्वजनिक रस्त्यात एकाने विहीर बुजवून बांधकाम केले ते बांधकाम काढण्याचे मुख्याधिकाऱ्यांनी आदेश दिले होते; परंतु काढलेले नाहीत. हे अतिक्रमित बांधकाम काढण्यासाठी त्रस्त झालेले नागरिक नगरपालिका कार्यालयाच्या व लोकप्रतिनिधींच्या पायऱ्या झिजवीत आहेत.
मंत्र्यांच्या दालनात
अचलपूर येथील अलकरीम कॉलनीजवळील तहसील रोडवरील पॅराडाईज कॉलनीमधील सूतिकागृह व भाजीपाला मार्केटसाठी आरक्षित असलेल्या जागेवर भूखंड पाडून ते प्लॉटधारकांना सामूहिकरीत्या विकण्यात आले. त्यावर बांधकामाची परवानगी नसताना एका प्लॉटधारकाने बांधकाम केल्याने अल्पसंख्यक आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष मो. अजहर यांनी तक्रार नगरपालिकेकडे केली होती. त्यामुळे त्यांना बेदम मारहाण करण्यात आली होती. याची तक्रार त्यांनी गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांचेकडे केली होती. याची पोलीस चौकशीदेखील झाली. त्यानंतर हे बांधकाम पाडावे म्हणून सेवानिवृत्त शिक्षिका अफरोजबाजी यांनी आमरण उपोषणाचा इशारा दिला होता. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून हे प्रकरण गाजत आहे. पण अतिक्रमण जैसे थे आहे, हे विशेष.

Web Title: Avoid to remove encroachment construction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.