लघुउद्योगास वीज जोडणी देण्यास टाळाटाळ
By Admin | Updated: March 18, 2015 00:20 IST2015-03-18T00:20:29+5:302015-03-18T00:20:29+5:30
स्वयंरोजगारासाठी शासन बेरोजगारांना प्रोत्साहित करत अनेक योजना सुरू करीत आहेत.

लघुउद्योगास वीज जोडणी देण्यास टाळाटाळ
नांदगाव खंडेश्वर : स्वयंरोजगारासाठी शासन बेरोजगारांना प्रोत्साहित करत अनेक योजना सुरू करीत आहेत. मात्र शासनाचेच काही विभागाच्या असहकार्याने मुळ उद्देशालाच खिळ बसत असल्याचा प्रकार नांदगाव खंडेश्वर येथे घडला आहे. लघूउद्योगासाठी वीज जोडणीनाकारणाऱ्या बेरोजगारांनी १८ मार्चपासून अमरावतीच्या विद्युत भवन कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे.
लाखावर रक्कमेचा भरणा केल्यावर वीज जोडणी देण्यास टाळाटाळ होत आहे. त्यामुळे बेरोजगार युवकांना परिवाराचा चरितार्थ चालविणे कठीण झाले आहे. कर्जाचे हप्ते सुरू झालेत. परिणामी लघूउद्योजकांनी १८ मार्चपासून अमरावती विद्युत भवन कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचे पत्र दिले आहे. नांदगाव खंडेश्वर येथील बेरोजगार युवक सुशील शेंडे व मयुर मंडलीक यांनी पंतप्रधान स्वयंरोजगार योजने अंतर्गत जिल्हा उद्योग केंद्राद्वारा जैविक कोळसा (व्हाईट कोल) लघूउद्योगाकरीता प्रस्ताव सादर केला. त्यांना सेंट्रल बँक आॅफ इंडियाने पतपुरवठा केला. कारखान्यासाठी आवश्यक शेड, मशिनरी, धर्मकाटा आदीची उभारणी त्यांनी केली. १६ सप्टेंबर २०१४ ला प्रकल्पास वीज जोडणीसाठी अर्ज सादर केला. वीज कंपनीच्या मागणीनुसार १२ जानेवारी २०१५ ला १,११,३०० रूपयांचा भरणा देखील मात्र अद्यापपर्यंत त्यांना वीज जोडणी न देता टाळाटाळ करण्यात येत आहे. वारंवार पाठपुरावा करून जोडणी करण्यात येत नसल्याने त्यांनी १८ मार्चपासून अमरावती येथील विद्युत भवनासमोर उपोषणाला बसण्याचा ईशारा दिला आहे. यासंदर्भात वीज कंपनीचे सहाय्यक अभियंता यांच्याशी संपर्क साधला असता ते उपलब्ध होऊ शकले नाही. (प्रतिनिधी)