राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी अविनाश मार्डीकर कायम
By Admin | Updated: February 21, 2015 00:33 IST2015-02-21T00:33:49+5:302015-02-21T00:33:49+5:30
महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस फ्रंटच्या गटनेतापदी अविनाश मार्डीकर यांच्या

राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी अविनाश मार्डीकर कायम
सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय : रवी राणा यांना राजकीय झटका
अमरावती : महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस फ्रंटच्या गटनेतापदी अविनाश मार्डीकर यांच्या नावावर सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी शिक्कोमोर्तब केले.त्यामुळे काही महिन्यांपासून राष्ट्रवादीचे गटनेते अविनाश मार्डीकर की सुनील काळे? या वादावर पडदा पडला आहे. खऱ्या अर्थाने ही न्यायालयीन लढाई संजय खोडके विरुद्ध आ. रवी राणा यांच्यात राजकीयदृष्ट्या लढली गेली. त्यामुळेच सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय आ. रवी राणा यांना राजकीय दृष्ट्या मोठा झटका मानला जात आहे.
महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस फ्रंटची सदस्य संख्या २३ आहे. या गटाचे नेते म्हणून अविनाश मार्डीकर यांची २०१२ मध्ये नियुक्ती करण्यात आली. १७ राष्ट्रवादी तर ६ अन्य पक्षाचे सदस्य एकत्रित करुन फ्रंट स्थापन करण्यात आला होता. या सर्व सदस्यांनी प्रतिज्ञापत्र सादर करुन मार्डीकर यांना गटनेता म्हणून स्वीकारले होते. मात्र, लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने आ. रवी राणा यांच्या पत्नी नवनीत राणा यांना उमेदवारी दिली. ही बाब राष्ट्रवादीचे तत्कालीन प्रदेश सचिव संजय खोडके यांना अमान्य होती. त्यांनी पक्षाविरूध्द बंड पुकारून लोकसभा निवडणुकीत थेट अजित पवार यांनाच आव्हान दिले होते. परिणामी राष्ट्रवादी पक्षाने संजय खोडके यांचे पक्षातून निष्कासन केले. एवढेच नव्हे तर खोडके यांचे वर्चस्व असलेल्या महापालिकेतील राष्ट्रवादी कॉग्रेसच्या गटनेतेपदी सुनील काळे यांची नियुक्ती तत्कालीन प्रदेशाध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांनी केली. त्यानुसार राष्ट्रवादीने विभागीय आयुक्तांना सुनील काळे यांची गटनेतेपदी नियुक्ती करण्याचे पत्र पाठविले होते. या पत्राची दखल घेत विभागीय आयुक्तांनी महापालिका आयुक्तांना सुनील काळे यांच्या नावाची घोषणा करुन तशी नोंद घ्यावी, असे आदेशित केले होते. परंतु मार्डीकर यांनी या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते.