सायंस्कोरमध्ये आॅटोचे पार्किंग!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2016 01:00 IST2016-02-07T01:00:44+5:302016-02-07T01:00:44+5:30
जिल्हा परिषदेच्या अखत्यारितील सायन्सकोर मैदानात अनेक दिवसांपासून आॅटोची अवैध पार्किंग करण्यात येत आहे.

सायंस्कोरमध्ये आॅटोचे पार्किंग!
‘पाल’ थाटली : वॉलकंपाऊंड फोडले, मैदानाला अतिक्रमणाचा विळखा
अमरावती : जिल्हा परिषदेच्या अखत्यारितील सायन्सकोर मैदानात अनेक दिवसांपासून आॅटोची अवैध पार्किंग करण्यात येत आहे. या मैदानाचा अतिक्रमणाचा विळखा अधिक घट्ट होत आहे. विशेष म्हणजे सायन्सकोर मैदानाची कुंपण भिंत तोडण्यात आली आहे. त्या परिसरात रोज १० ते १५ आॅटो पार्क केले जात आहे.
शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या सायंस्कोर मैदानात जिल्हा परिषदेची विख्यात लालशाळा व त्यापुढे खेळाचे मैदान आहे. प्रचंड आवाका असलेल्या या मैदानाला जिल्हा परिषदेने कुंपण भींत बांधली आहे. मात्र काही असामाजिक तत्वांनी या भीतीला मोठमोठी भगदाड पाडली आहेत.
बसस्थानकाच्या समोर असलेल्या भींताला मोठे भगदाड पाडल्यानंतर मैदानाच्या आत आॅटोची पार्किंग सजविली गेली आहे. काही दिवसांपासून येथे आॅटोची गर्दी होत असून येथे दिवसभर आॅटो पार्क केली जाते. तेथूनच प्रवाशांची ने-आण केली जाते. याबाबत जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग अनभिज्ञ आहे. सायंस्कोर मैदानात होत असलेल्या प्रत्येक कार्यक्रमाच्या आयोजकांना विशिष्ट शुल्क आकारले जाते. तथापि या मैदानाच्या सुरक्षेकरिता सुरक्षा रक्षक नेमले जात नाही. सुरक्षा रक्षकाविना सायन्सकोर मैदानाची सुरक्षा धोक्यात आली आहे. कुणीही हटकण्यास येत नसल्याने येथे आॅटोचालकांनी पार्किंग थाटली असताना दोन दिवसांपासून काहींनी या मैदानाच्या रुक्मिणीनगरच्या बाजूने असलेल्या भागात ‘पाल’ बनविले आहेत. आॅटो पार्किंगसह ‘पाला’चे अतिक्रमण झाल्याने अजून नव्याने अन्य अतिक्रमणधारक थिरण्याची भीती व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)