महत्त्वपूर्ण विभागांकडे लक्ष
By Admin | Updated: May 7, 2015 00:01 IST2015-05-07T00:01:58+5:302015-05-07T00:01:58+5:30
आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी पहिल्या टप्प्यात प्रभारी अधिकारी पदांच्या जागांवर पदोन्नती देण्याची कार्यवाही केली ...

महत्त्वपूर्ण विभागांकडे लक्ष
अमरावती : आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी पहिल्या टप्प्यात प्रभारी अधिकारी पदांच्या जागांवर पदोन्नती देण्याची कार्यवाही केली आहे. मात्र एकाच विभागात टेबलवर अविरतपणे कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांची स्वतंत्र यादी तयार करण्याची सूचना आयुक्तांनी दिली आहे. त्यामुळे येत्या काळात एका विभागातून दुसऱ्या विभागात कर्मचाऱ्यांची बदली झाली तर वावगे ठरु नये, हे खरे आहे. सामान्य प्रशासन विभागात पदोन्नतीवर मंगेश जाधव यांच्या जागी अलुडे हे पदोन्नतीवर अधीक्षकपदी रुजू झाले आहेत.
जाधव यांच्याकडे सामान्य प्रशासन विभागाच्या अधीक्षकपदाचा कारभार सोपविण्यात आला होता. परंतु आयुक्त गुडेवार हे रुजू होताच त्यांनी महत्त्वपूर्ण विभागाकडे लक्ष वेधून ढिसाळ कारभारावर नियंत्रण आणण्याची कारवाई केली आहे. हल्ली सामान्य प्रशासन विभागात यादी तयार करण्याची कार्यवाही सुरु झाली आहे. विभागनिहाय कर्मचाऱ्यांची यादी तसेच कार्यरत असलेले वर्ष आदींची माहिती गोळा केली जात आहे. प्रभारी कारभार हाकणाऱ्या कनिष्ठ लिपीकांना पूर्व पदावर आणण्याची कारवाई आयुक्तांनी करताच काही कर्मचाऱ्यांमध्ये आनंद पाहावयास मिळाला आहे. दुसरीकडे विभागनिहाय बदल्यांची प्रक्रिया केंव्हा राबविली जाणार याकडे लक्ष लागले आहे. तत्कालीन आयुक्त अरुण डोंगरे यांच्या कार्यकाळातच विभागनिहाय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. परंतु काही तांत्रिक कारणांमुळे या बदल्या प्रलंबित राहिल्यात. अखेर आयुक्त गुडेवार यांनी प्रलंबित असलेली कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची फाईल नव्याने सुरु करण्याचे आदेश दिले आहे. त्यामुळे विभागनिहाय बदल्यांमध्ये कोणत्या कर्मचाऱ्यांनी कोठे बदली केली जाते, हे लवकरच स्पष्ट होईल. (प्रतिनिधी)
महापौर, आयुक्त, उपायुक्त, झोन कार्यालयांवरही लक्ष
कर्मचाऱ्यांची बदली करताना केवळ महापालिकेचे मुख्यालयातील कर्मचाऱ्यांच्याच बदलीची प्रक्रिया राबविली जाणार असे नाही तर यात महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती, आयुक्त, उपायुक्त, झोन कार्यालयात कार्यरत कर्मचाऱ्यांचीही बदली केली जाईल, असे संकेत आहे. काही कर्मचारी वर्षांनुवर्षे एकाच मलईदार टेबलवर कार्यरत असून अशा कर्मचाऱ्यांची बदली करण्याला आयुक्तांनी प्राधान्य दिल्याची माहिती आहे.