गळा आवळून वृद्ध महिलेचे दागिने पळविले
By Admin | Updated: June 21, 2014 01:17 IST2014-06-21T01:17:02+5:302014-06-21T01:17:02+5:30
दोघे भामट्यांनी एका वृद्ध महिलेचा गळा आवळून तिचे दागिने पळविल्याची घटना फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यांतर्गत ...

गळा आवळून वृद्ध महिलेचे दागिने पळविले
अमरावती : दोघे भामट्यांनी एका वृद्ध महिलेचा गळा आवळून तिचे दागिने पळविल्याची घटना फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यांतर्गत फरशी स्टॉपजवळील सुभाष कॉलनीत गुरुवारी दुपारी ३ वाजता घडली. सविता मुकुंदराव पांढरीकर (७५,रा. सुभाष कॉलनी) असे दागिने चोरी गेलेल्या महिलेचे नाव आहे.
सविता पांढरीकर यांना दोन विवाहित मुली आहेत. त्यांची एक मुलगी नागपूर व दुसरी मुलगी सोनाली ही न्यु कॉलनीत वास्तव्यास आहे. गुरुवारी सकाळी १० वाजता त्यांच्या घरी दोन अज्ञात इसम आले. यावेळी त्यांची मुलगी सोनाली या घरी होत्या. हेल्थ केअर कंपनीचे प्रतिनिधी असल्याचे सांगून त्यांनी बँकेकडून वृद्ध व्यक्तींसाठी वैद्यकीय विमा योजना सुरु असल्याची बतावणी केली. काही वेळाने सोनाली या बँकेत ड्युटीसाठी निघून गेल्या. दुपारच्या सुमारास संबंधित व्यक्ती परिसरात फिरले. सविता यांच्या घरी कोणी नसल्याची संधी साधून त्यांनी पुन्हा सविता यांच्या घरात प्रवेश केला व त्यांना मारहाण करुन त्यांचा गळा आवाळला. यामध्ये त्या बेशुद्ध होऊन जमिनीवर कोसळल्या. सविता यांचा मृत्यू झाल्याचे समजून संबंधित इसमांनी त्यांच्या अंगावरील ४० ग्रॅम सोन्याच्या दोन बांगड्या व २० ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र हिसकून पळ काढला. दोन तास सविता या घरात बेशुद्ध पडल्या होत्या. सायंकाळी ५ वाजता त्यांना जाग आली. प्रकृती ठीक नसल्याने त्यांनी मुलीला फोन करुन घरी बोलावले. सोनाली यांनी घरी येऊन सविता यांना एका खासगी रुग्णालयात दाखल केले. रात्री उशिरा त्यांनी घडलेला प्रकार त्यांच्या मुलीला सांगितला. याची माहिती सोनाली यांनी नियंत्रण कक्षाला दिली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमेश आत्राम, फ्रेजरपुऱ्याचे पोलीस निरीक्षक रियाजोद्दीन देशमुख यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. पोलीसांनी घटनेचा पंचनामा करुन आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविला. घरी आलेल्या बदमाशांना सविता वत्यांची मुलगी सोनाली यांनी पाहीले होते. त्यानुसार पोलीसांनी आरोपींचे स्केच तयार केले आहे.