यशोमतींवर हल्ल्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2016 23:59 IST2016-06-25T23:59:31+5:302016-06-25T23:59:31+5:30
तिवस्याच्या आमदार यशोमती ठाकूर या तळेगाव ठाकूर येथे जलयुक्त शिवारमधील कामाचे भूमिपूजन करीत असताना भाजपच्या निवेदिता चौधरी यांच्या समर्थकाने ...

यशोमतींवर हल्ल्याचा प्रयत्न
तिवस्यात गुन्हा दाखल : दगड भिरकावला, दंगा नियंत्रक पथकाला पाचारण
अमरावती : तिवस्याच्या आमदार यशोमती ठाकूर या तळेगाव ठाकूर येथे जलयुक्त शिवारमधील कामाचे भूमिपूजन करीत असताना भाजपच्या निवेदिता चौधरी यांच्या समर्थकाने यशोमती ठाकूर यांच्या दिशेने दगड भिरकावला. तो थोडक्यात हुकल्यामुळे यशोमती ठाकूर बचावल्या; तथापि त्या बसलेल्या पोकलँडची काच मात्र फुटली. तिवसा पोलीस ठाण्यात आ. यशोमती यांनी तक्रार दाखल केली. दोन्ही गटांत काही काळ मोठा तणाव निर्माण झाला होता.
आमदारांनी पोलिसात दाखल केलेल्या तक्रारीनुसार, तळेगाव ठाकुर येथे शनिवारी पिंगळा नदीच्या पात्रावर पूर संरक्षण भिंत आणि खोलीकरणाचे भूमिपूजन होते. आमदार आणि जलयुक्त शिवार योजनेच्या अध्यक्ष या नात्याने यशोमती ठाकूर यांना निमंत्रण होते. पोकलँडवरमधील चालकाच्या आसनावर बसून प्रतिकात्मकरित्या तो चालवून भूमिपूजन केले जाणार होते. तत्पूर्वी अधिकाऱ्यांशी चर्चा सुरू असताना, निवेदिता चौधरी दिघडे तेथे आल्या.
ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी
अमरावती :'ये यशोमती थांब. तुझा भूमिपूजनाचा अधिकार नाही. मी हे काम मंजूर करून आणले आहे', असे म्हणून आमदार यशोमती यांच्याशी अरेरावी केली. जय श्रीराम अशा घोषणा दिल्यात. इतक्यात भडकलेल्या जमावातून कुणीतरी दगड फेकला. यशोमतींना तो लागला नाही; पण पोकलँडचे काच फुटले. शासकीय कामकाजात निवेदिता चौधरी नेहमीच अडथळा निर्माण करतात, असे मुद्दे नमूद करून निवेदिता चौधरी यांच्यावर शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केल्याचे गुन्हे नोंदविण्याची मागणी तक्रारीतून यशोमती ठाकूर यांनी केली.
पोलिसांनी भाजपक्षाच्या अज्ञात व्यक्तिविरुद्ध भादंविच्या कलम ३३६ आणि ४२७ नुसार गुन्हे नोंदविले. दगडफेक व पोकलँडच्या नुकसानीचे हे गुन्हे आहेत.
निवेदिता चौधरी यांनीही पोलिसात तक्रार दिली. मी अभियंत्याशी चर्चा करताना यशोमती यांनी वादावादी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री प्रवीण पोटे आणि भाजपक्षाविरुद्ध असभ्य शब्दांचा वापर केला, असा उल्लेख तक्रारीत करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद घेतली.
घटनेची वार्ता पंचक्रोशीत वाऱ्यासारखी पसरली. तिवसा ठाण्यात नागरिकांसह दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली. दंगा नियंत्रक पथक पाचारण केले गेले. उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीनिवास घाडगे तिवस्यात पोहोचले होते. (प्रतिनिधी)
हे हल्ल्याचेच षड्यंत्र - यशोमती
रामाच्या नावाने राजकारण करायचे आणि विकास कामात अडथळा आणायचा, निवेदिता चौधरी यांच्याकडून हा प्रकार नेहमी केला जातो. शनिवारी त्यांनी तळेगावच्या सरपंचांना शिवीगाळ केली. अरेतुरे करुन माझ्या अंगावर धावल्या. मी पोकलँडचे पूजन करीत असताना निळा शर्ट घातलेल्या युवकाने दगड मारला. मी थोडक्यात बचावले.
निवेदिता चौधरींचे आरोप बिनबुडाचे
माझ्यावर हल्ला करण्याचेच हे षड्यंत्र होते. यापूर्वी गोंदियात गोपालदास अग्रवाल या काँग्रेसच्या ज्येष्ठ आमदारांवर भाजपच्या कार्यकर्त्याने हल्ला केला होता. माझ्याबाबतही तेच प्लॅनिंग होते. मी महिला असल्याने आणि माझे समर्थक उपस्थित असल्याने ते साध्य होऊ शकले नाही. मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांचा उल्लेख मी कुठेही केलेला नाही. बोलायचे झालेच तर दादा असेच संबोधन मी वापरते. मुद्दाच मिळत नसल्याने सीएमना अपशब्द बोलल्याचे लाजिरवाणे आरोपही केले जात आहे. माझ्यापूर्वी १० वर्षे भाजपचे आमदार होते. त्यांना आम्ही अशी वागणूक कधीच दिली नाही, अशी प्रतिक्रिया आमदार यशोमती ठाकूर यांनी दिली.
यशोमती श्रेय लाटतात- निवेदिता
तळेगाव ठाकूर येथील जलयुक्त शिवारचे ८० लाखांचे काम मी मंजूर करविले. सोमवारी पालकमंत्र्यांच्या हस्ते या कामाचे भूमिपूजन ठरविले होते. या कामात आ.ठाकूरांनी अनेक वेळा अडथळा आणला. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या कार्यक्रमात मी व्यस्त राहणार हे हेरून आमदारांनी रातोरात या कामाचे भूमिपूजन ठरविले. ही माहिती मिळाल्याने मी तेथे पोहोचले.
त्यांनीच घातली हुज्जत
नदीचे खोलीकरण न करता पात्रामधील बेशरम काढावी असे उपअभियंत्यांना सांगत असताना आ.ठाकूर यांनी हुज्जत घातली. मी मंजूर करून आणलेल्या अनेक कामांचे श्रेय लाटण्याचा प्रकार आ.ठाकूर यांनी अनेकदा केल्याचा आरोप निवेदिता चौधरी यांनी केला.